

Farm-Based Entrepreneurship: निसर्ग आणि मानवी जीवनात अन्नसाखळीला मोठे महत्त्व आहे. या साखळीतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो. याच साखळीतून मानवी आरोग्यासाठी शेती आणि निसर्गातून पोषक अन्न मिळते. हे लक्षात घेऊन शेती आणि पूरक व्यवसायाची सांगड घालून एकात्मिक शेती पद्धतीचे नियोजन चिंचोलीराव वाडी (ता.जि. लातूर) येथील संजीवनी अंगद नागमोडे यांनी केले आहे.
लातूरपासून बारा किलोमीटर अंतरावरील चिंचोलीराव वाडी शिवारात नागमोडे कुटुंबीयाची बारा एकर माळरान जमीन आहे. संजीवनी नागमोडे यांचे पती अंगद नागमोडे हे पोलिस वायरलेस विभागात कर्मचारी होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. गडचिरोली जिल्ह्यात सेवा करताना त्यांनी या भागातील लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्याचे मूळ पर्यावरणपूरक शेतीमध्ये दडले होते, हे त्यांच्या लक्षात आले. यामुळेच त्यांनी पत्नी संजीवनीच्या मदतीने माळरान जमिनीत पर्यावरणपूरक शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यापूर्वी त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. पहिल्या टप्प्यात तल, मृदा संधारणावर भर दिला. पावसाचे पाणी शेतशिवारात मुरण्यासाठी २००४ मध्ये जमिनीचा उतार पाहून सलग आडवे सात फूट खोल, दोन फूट रुंद आणि पाचशे फूट लांबीचे चर खोदले. दोन चरांतील अंतर १८ फूट ठेवले. या क्षेत्रामध्ये जमीन सुपीकतेसाठी ताग, धैंचा लागवड केली. बारा एकर क्षेत्रापैकी दहा एकरात ऊस लागवड केली. या दरम्यानच्या काळात शेतातील चरात परिसरातील पालापाचोळा, उपलब्ध शेणखत टप्याटप्याने भरण्यात आले. त्याचा चांगला फायदा झाला. या दरम्यान नाबार्डच्या योजनेतून दहा म्हशींची खरेदी करून दूध व्यवसाय सुरू केला. उपलब्ध शेणखताचा शेतामध्ये वापर केला. त्यामुळे जमीन सुपीकता वाढीला मदत झाली.
फळबाग, भाजीपाल्याची लागवड
फळबाग लागवडीबाबत संजीवनी नागमोडे म्हणाल्या, की पाणीटंचाईमुळे ऊस लागवड बंद करून २०१२ मध्ये दहा एकरांवर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. पाणी टंचाईमुळे डाळिंबाच्या वाढीला फटका बसला होता. परंतु जमिनीत कुजवलेला पालापाचोळा, शेणखताच्या भरपूर वापरामुळे ओलावा टिकून राहिल्यामुळे डाळिंबाच्या झाडांनी तग धरला. या बागेचे आम्ही चांगले व्यवस्थापन ठेवले. उत्पादित डाळिंबाचा चांगली चव असल्याने विक्रीसाठी अडचण येत नाही. डाळिंब विक्रीतून वर्षाला तीन लाखांचे हमखास उत्पन्न मिळते. डाळिंबासोबत काही क्षेत्रावर भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले जाते. डाळिंबाच्या दोन झाडांमध्ये शेवगा लागवड केली आहे, त्याचेही चांगले उत्पादन सुरू आहे. डाळिंब, शेवग्याच्या सोबत शेतशिवारात लिंब, पेरू, जांभूळ अशी विविध प्रकारची फळझाडे लावली आहेत.
वीस वर्षांत जमिनीची एकदाही मशागत केलेली नाही. बारा एकरात ठरावीक अंतरावर चर केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. यामुळे शेततळे, विहीर आणि कूपनलिकेतील पाणीपातळी वाढली आहे. एक शेततळे उंचावर घेतले असल्याने सायफन पद्धतीने शेतीला पाणी देता येते. शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि गोपालनातून तयार झालेल्या खताची स्लरी करुन डाळिंब बागेला दिली जाते. त्यामुळे खताचा खर्च वाचतो.
पूरक उद्योगाला सुरुवात
संजीवनी नागमोडे यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड दिली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, की शेततळ्यात मत्स्य व्यवसाय सुरू केला. पीएम मत्स्य संपदा योजनेतून बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून हौदामध्ये तिलापिया माशांचे संगोपन केले आहे. गावपरिसरात खडी केंद्र आणि वीटभट्ट्यांवर परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. या मजुरांकडून माशाची मोठी मागणी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायातून किफायतशीर उत्पन्न मिळते. नाबार्ड योजनेतून जनावरांचा गोठा तयार केला आहे. सध्या एक गाय, तीन म्हशी आणि वगारी मिळून दहा जनावरे आहेत. याचबरोबरीने ४० शेळ्या आहेत.
या शेळ्यांची परिसरात विक्री होते. गावरान अंड्यांची मागणी लक्षात घेऊन कुक्कुटपालन सुरू केले आहे. सध्या ७० गावरान कोंबड्या आहेत. दररोज तीस अंड्यांची १५ रुपये दराने विक्री होते. जनावरांसाठी शेतात चारा पिकांची लागवड केली आहे. शुद्ध तेल उत्पादन तसेच जनावरांसाठी पेंडीच्या उपलब्धता होण्यासाठी तेलघाणा सुरू केला आहे. कृषी विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेतून शेडनेटमध्ये भाजीपाला रोपवाटिका सुरू केली आहे.
‘अॅग्रोवन’मुळे प्रगतीची दिशा
संजीवनी नागमोडे यांना वाचनाची आवड आहे. अॅग्रोवनमधील महिला शेतकऱ्यांच्या यशकथा वाचून त्यांना शेतीपूरक उद्योगासाठी प्रेरणा मिळाली. येत्या काळात जिवामृत आणि गांडूळ खत निर्मितीचे त्यांनी नियोजन केले आहे. २०२० पासून संजीवनी नागमोडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानात (उमेद) सीटीसी म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य तसेच परसबागेतून निरोगी भाजीपाला उत्पादनासाठी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करतात. महिला बचत गटांकडून उत्पादित मालांची विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. दैनंदिन शेती नियोजनात मोठा मुलगा अभिजित आणि पतीची मदत होते. दुसरा मुलगा सिद्धांत हा एम. ए. आणि तिसरा मुलगा संदेश हा बीएएमएसचे शिक्षण घेत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.