

Agriculture Rural Market: नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद ही सुमारे १३० कोटींच्या पुढे उलाढाल पोहोचलेली मोठी बाजार समिती म्हणून प्रसिद्ध आहे. धने व लाल मिरचीसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या या बाजार समितीत सुमारे १४ प्रकारच्या शेतीमालाची आवक होते. तेलंगणाच्या सीमेजवळ असल्याने त्या परिसरातील गावांमधील शेतकरी व व्यापाऱ्यांनाही माल खरेदी-विक्रीची सोय येथे झाली आहे.
महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवर धर्माबाद तालुक्यात नांदेड जिल्ह्यातील दुसरी सर्वांत मोठी उलाढाल असलेली म्हणून धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. पंचवीस जून, १९३८ मध्ये तिची स्थापना झाली. धर्माबाद तालुक्यातील ५८ गावे तसेच उमरी तालुक्यातील बोळसा खुर्द, बोळसा बुद्रुक व धानोरा बुद्रुक अशा तीन गावांमुळे एकूण ६१ गावांमधील शेतीमाल धर्माबादच्या बाजार समितीत येतो.
त्यासोबतच तेलंगणाच्या सीमेजवळील देखील ही मोठी बाजारपेठ असल्याने त्या परिसरातील अनेक गावांमधूनही शेतकरी येथे शेतमाल घेऊन येतात. त्यामुळे दरवर्षी आवकेत मोठी वाढ होत आहे.धर्माबाद शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या या बाजार समितीचा परिसर सुमारे १९ एकरांवर पसरला आहे. करखेली (४.५ एकर), जारिकोट (१५ एकर), व सायखेड (२.५ एकर) येथे उपबाजार समित्या आहेत. मुख्य यार्डमध्ये व्यापाऱ्यांना ६६ भूखंड कराराने (लीज) तर ६५ गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.
चौदा प्रकारच्या धान्याची आवक
बाजार समितीचे उत्पन्न मुख्यतः बाजार, गाळे आणि भूखंड भाडेशुल्कावर अवलंबून आहे. शेतीमालावर ०.८० पैसे प्रति शेकडा शुल्क आकारले जाते. सन २०२४-२५ मध्ये बाजार समितीचे एकूण निव्वळ उत्पन्न दोन कोटी ९० लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. उत्पन्नात मागील काही वर्षांपासून वृद्धी आहे. धने व लाल मिरचीसाठी ही बाजारपेठ विशेष प्रसिद्ध आहे. धने खरेदीसाठी तमिळनाडू येथील तर मिरचीच्या खरेदीसाठी तेलंगण व आंध्र प्रदेशातून व्यापारी येतात. यासोबत सोयाबीन, कापूस, हरभरा, मूग, उडीद, करडी, भुईमूग, तीळ, मका अशा विविध शेतीमालांची आवकही येथे होते.
बाजारपेठेतील मुख्य सुविधा
प्रत्येकी १२ हजार चौरस फूट आकाराची सहा लिलाव शेड्स आहेत. येथे माल सुरक्षित ठेवण्यात येतो आणि दररोज नियोजनबद्ध लिलावही होतो. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात आवक होण्यास चालना मिळते. बाजार समितीच्या वतीने शेतीमाल तारण कर्ज योजना २००१ पासून राबविण्यात येते. सन २०२२-२०२३ मध्ये २४७ शेतकऱ्यांना, तर दोन कोटी नऊ लाख ९५ हजार रुपयांचे तर २०२३-२०२४ मध्ये ८८ शेतकऱ्यांना ७९ लाख २० हजार रुपयांचे तारण कर्जवाटप करण्यात आले. प्रगत कार्यप्रणाली व पारदर्शकता असा बाजार समितीचा कारभार आहे. शेतीमालाचे चुकारे २४ तासांत शेतकऱ्यांना देण्यात येतात.
दररोज लिलाव प्रक्रिया होत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागत नाही. वजन व मापे विभागाकडून दर सहा महिन्यांनी वजन काट्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे चोख वजनाची हमी मिळते. बंदिस्त यार्ड असल्यामुळे शेतीमाल चोरीचा धोका नसतो. तीन मुख्य प्रवेशद्वारांमधून आवक होते. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, जनावरांसाठी पाण्याचे हौद, विश्रांतीसाठी सिमेंट बेंच, स्वच्छता व सुरक्षाव्यवस्था आदी सुविधा आहेत. सी. डी. पाटील सचीव तर सहसचिव म्हणून वेणुमाधव कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी आहे.
सामाजिक बांधिलकी
बाजार समितीकडून सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात करखेली, धानोरा, चिकना, जारिकोट येथील मालगुजारी तलावातून गाळ काढण्यासाठी आठ लाखांचे यंत्र व इंधन पुरवठा करण्यात आला. गावांमध्ये विंधन विहिरी, पाण्याचे हौद, बस थांबे उभारण्यात आले. पेट्रोल पंप उभारण्यासाठी येताळा रस्त्यावर जागेची चाचपणी करण्यात आली आहे.
धने, मिरचीचा वैशिष्ट्यपूर्ण बाजार
नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांसह तेलंगणातील मुधोळ मंडळ कार्यक्षेत्रातील शेतकरी सोयाबीन काढणीनंतर रब्बीमध्ये गावरान धन्याची पेरणी करतात. या धन्याचे वेशिष्ट्य म्हणजे चवीला तो रुचकर व स्वादिष्ट असतो. यामुळे देशातील अनेक भागातून मसाले उद्योगासाठी या धन्याला मागणी असते. धर्माबाद ‘एमआयडीसी’ मध्येही सुमारे १० ते १२ मसाला प्रक्रिया उद्योग आहेत.
त्यामुळे या उद्योगाला वर्षभर धन्याची गरज भासते. धर्माबाद बाजार समितीमध्ये त्याचा लिलाव आवकेवर अवलंबून असतो. आवक वाढली तर दररोज लिलाव होतो. सध्या दर गुरुवारी आणि सोमवारी लिलाव होत आहे. यावेळी २० ते २५ खरेदीदार व्यापारी उपस्थित असतात. काही व्यापारी त्याचा साठा करतात. राज्यस्थानातही मागणी असल्याने तेथेही पाठवितात. सध्या कमाल ६१०० रुपये तर किमान ९१५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
लाल मिरचीची आवक
महाराष्ट्रातील सर्वात मोठा लाल मिरचीचा बाजार म्हणून धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या ठिकाणी वर्षभर या मिरचीची आवक होते. तेलगंण व आंध्र प्रदेश व त्यातही मुख्यत्वे गुंटूर, वारंगल, निझामाबाद, आदिलाबाद, झहिराबाद, हैदराबाद आदी भागातून लाल वाणाची मिरची विक्रीसाठी येते. स्थानिक शेतकऱ्यांकडील शेवळी (गावरान) मिरची देखील या बाजारात येते. या मिरचीचा उपयोग मुख्यत: पावडर बनविण्यासाठी होत असल्याने व्यापाऱ्यांकडून त्यास मोठी मागणी असते.
धर्माबाद एमआयडीसीमध्ये असलेल्या प्रक्रिया उद्योगासाठी धन्याबरोबरच या मिरचीला देखील वर्षभर मागणी असते. पातळ साल, बियांचे प्रमाण कमी, चव आणि तिखटपण या वैशिष्ट्यांसाठी ही मिरची प्रसिध्द आहे. अलीकडील काळात तिची मागणी अधिक वाढल्याचे दिसून येते. सध्या बाजारात कमाल १० हजार ८०० रूपये तर किमान ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
अन्य शेतमालांची आवक
बाजार समितीत तीळ, करडई, तूर, हरभरा, उडीद आदींचीही चांगल्या प्रमाणात आवक होत असते. खरेदीदारांची संख्याही चांगली असल्याने अन्य बाजारांच्या तुलतेन दरही चांगले मिळतात असे शेतकरीसांगतात. सध्या बाजारात उन्हाळी तिळाची आवक सुरु झाली आहे. तीन दिवसांपूर्वी १० क्विंटल एवढ्या प्रमाणात पांढऱ्या तिळाची आवक झाली. प्रति क्विंटल किमान ९००० रूपये तर कमाल ९६९० रूपये दर मिळाला.
पांढऱ्या तुरीची ७० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला किमान ६३७० तर कमाल ६८६० दर मिळत आहे. बाजारात ५५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्यास किमान ५३९० तर कमाल ५६३५ दर (प्रति क्विंटल) मिळाला. करडईची दहा क्विंटल तर उडीदाची ३० क्विंटल आवक झाली. उडदास कमाल ७२०० तर किमान ७००० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.