Dairy Business : दुग्धव्यवसायातून पंचक्रोशीत कमाविले नाव

Milk Production : कुकाणे (जि. नगर) येथील अशोक आणि अजित या दरवडे बंधूंनी सहा वर्षांपूर्वी एका म्हशीपासून दुग्ध व्यवसाय सुरु केला. आज तो ४० जनावरांपर्यंत विस्तारला आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

सूर्यकांत नेटके

Darwade Brothers : कुकाणे (जि. नगर) येथील अशोक आणि अजित या दरवडे बंधूंनी सहा वर्षांपूर्वी एका म्हशीपासून दुग्ध व्यवसाय सुरु केला. आज तो ४० जनावरांपर्यंत विस्तारला आहे. गुणवत्ता व शुध्दतेला सर्वोच्च प्राधान्य देत पंचक्रोशीत दूध, दही, पनीर तर बाहेरून खवा घेत विक्री सुरू केली. आज याच व्यवसायातून आर्थिक प्रगती, भांडवलवृद्धी सोबत पंचक्रोशीत खात्रीचे नाव कमावणे शक्य झाले अशी समाधानाची पावती दरवडे बंधू देतात.

धरणाच्या पाण्याची उपलब्धता असल्याने नेवासा तालुक्यातील कुकाणे परिसर (जि. नगर) तसा बागायती आहे. येथील मारुती नरवडे यांना अशोक व अजित ही दोन मुले. लहान-मोठे मिळून अकरा सदस्यांचे हे कुटुंब. अशोक बारावीपर्यंत तर अजित पदवीपर्यंत शिकलेले. पाच एकर शेती. दोघेही भावंडे खासगी बॅंकेत बचत प्रतिनिधी (पिग्मी एजंट) म्हणून काम करायचे. त्यामुळे शेतीही दुसऱ्याकडे कसायला असे. सुमारे १९ वर्षे बचत प्रतिनिधी म्हणून अनुभव घेतल्यानंतर दोघा भावंडांनी शेती आणि पूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

दूधव्यवसाय आणि व्यवस्थापन

पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाची निवड केली. म्हशीच्या दुधाला चांगली मागणी असल्याने मुऱ्हा जातीची म्हैस खरेदी केली. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील म्हशींचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे म्हैस खरेदी करणे सोपे गेले. दररोज दहा लिटर दूध मिळू लागले. पैका पाच लिटर कुटुंबासाठी व पाच लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री सुरु केली. दुधाची मागणी वाढू लागली. आता व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न सुरू झाले. दोन वर्षांत म्हशींची संख्या ११ झाली. शेतात गोठा बांधला.
दुधाची गुणवत्ता जपल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केला. हरियाना येथून तीन वर्षापूर्वी मुऱ्हा म्हशीची खरेदी केली. दोन्ही भावांनी पूर्ण वेळ शेतीलाच देण्याचे ठरविल्याने व्यवस्थापन सोपे झाले.
आज मुऱ्हा जातीच्या ३०, म्हैसाणा १० म्हशी शिवाय दोन देशी गायी, दोन बैल असे ४० ते ४४ पर्यंत पशुधन आहे. जनावरांची उत्तम पैदास गोठ्यातच व्हावी यासाठी हरियानातून सुमारे एक लाख रुपयांच्या वळूची खरेदी केली आहे.

Dairy Business
Dairy Business : तंत्रशुद्ध दुग्धव्यवसायातून सांगलीच्या अल्पभूधारक भिसे कुटुंबाची प्रगती

व्यवसायातील ठळक बाबी

- दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्चून नवीन गोठा निर्मिती.
-गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी दर्जेदार चाऱ्याला प्राधान्य. दहा ते पंधरा टक्केच रासायनिक खतांचा वापर. शेणखताच्या वापरावर भर. त्यामुळे चारा सकस दर्जाचा होतो.
-खुराक, वाळलेला चाऱ्यासाठी गव्हाच्या भुश्‍श्‍याचा वापर. भिजवून खुराक दिला जातो. त्यामुळे पचण्यास जड जात नाही. दुधाच्या दर्जात फरक पडतो.
- गोठा धुतलेले पाणी एका जागेत संकलित करून ते शेतीला सोडण्यात येते.
- गरजेनुसार सात ते दहा महिने वयाच्या कालवडीची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री.
-दूध काढणी, चारा व अन्य कामांसाठी सहा मजूर.
-गोठ्यात रबरी मॅट, फॉगर्स, पंखे आदींचा वापर. वासरांसाठी वेगळी व्यवस्था.

Dairy Business
Dairy Business : वाटा वाटा, मिळून सर्वच लाटा

ग्राहकांचा कमावला विश्‍वास
दररोज सुमारे २५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. उच्च काळात ते ३०० ते ३५० लिटर पर्यंतही पोचते. व्यवसाय सुरु केल्यानंतर पहिली पाच वर्षे घरोघरी जाऊन दुधाची ग्राहकांना विक्री केली. एक वर्षापूर्वी कुकाणे गावातच स्वतःचे विक्री केंद्र सुरु केले आहे. तेथून दिवसभरात २०० ते २५० लिटरपर्यंत दुधाची थेट विक्री होते. अन्य दुग्धोत्पादकांकडून पन्नास ते सत्तर लिटर दू खरेदी करून दही, पनीर निर्मिती होते.
एका व्यावसायिकाकडून खवा घेऊन त्याचाही पुरवठा होता. काही प्रमाणात खवा घरीही तयार केला
जातो. व्यवसायात प्रामाणिकपणा, सचोटी व गुणवत्ता ठेवल्याने ग्राहक कायमस्वरूपी जोडलेले आहेत.
कोरोना काळात देखील दरवडे बंधू यांच्याकडील दुधाची मागणी टिकून राहिली.
गणेशोत्सव, गौरी, दसरा, दिवाळी, लग्नसराई, पोळा आदी सण उत्सवांच्या काळात नेहमीपेक्षा दुधाची मागणी १०० लिटरने अधिक वाढते. त्यानुसार ग्राहकांची मागणी पुरवण्यासाठी दूध, खवा, दही, पनीर आदींचे नियोजन केले जाते. सध्या महिन्याला पाच ते सहा लाखांची उलाढाल तर दिवसाचे संकलन २० हजार रुपयांचे आहे. व्यवसायातून सुमारे ३० टक्के नफा होतो.

चारा बियाणे विक्री

जनावरांची वाढती संख्या पाहता ताज्या चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी पाच एकरांपैकी अडीच
एकरांवर सुपर नेपियर गवत व अडीच एकरांत ऊस लागवड केली आहे. या नेपियर वाणाची
काढणी करताना शेतकऱ्यांना त्रास होत नाही. कमी कालावधीत ते अधिक वाढते. अनेक शेतकरी
दरवडे यांच्याकडून या गवताच्या ठोंबाची खरेदी करतात. एक रुपयांना एक याप्रमाणे चार वर्षांत सुमारे सात लाख ठोंबाची विक्री केली आहे. कोरोना काळात गावातील शेतकऱ्यांना त्यांनी ठोंब मोफत वाटले आहेत.

घरच्यांची साथ

वडील मारूती, आई ताराबाई, अशोक, त्यांची पत्नी मनिषा, अजित व त्यांची पत्नी ज्योती असे सगळे जण दुग्धव्यवसाय राबतात. प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी आहे. कामांची अशी विभागणी झाल्यानेच ताण व कष्ट हलके झाले. व्यवसाय सोपा झाला. दरवडे बंधुंचे आजोबा कै. बाळदेव व आज्जी कै. पार्वतीबाई यांनी प्रतिकुल परिस्थितीतून जमीन खरेदी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरु केलेल्या या व्यवसायात आतापर्यत सुमारे एक कोटींचे भांडवल तयार झाले आहे. अशोक सांगतात की याच व्यवसायाने आम्हाला पंचक्रोशीत नाव मिळवून दिले. आत्तापर्यंत एकहजार शेतकऱ्यांनी आमच्याकडे भेट दिली आहे. येत्या काळात श्रीखंड व अन्य उत्पादनांचे कामही सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

संपर्क- अशोक दरवडे- ९८५२५५४०२१
अजित दरवडे ः ९८५२५५४०२५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com