आपले नेतेमंडळी, सन्माननीय लोकप्रतिनिधी कधी आक्रमक होतात ठाऊक आहे का? आता तुम्ही म्हणाल काहीही काय बोलता राव. छोट्या पडद्यावर आम्ही त्यांचे सभागृहातले पराक्रम आम्ही बघत नाही का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे चार दोन खासदार संसदेत तावातावानं सरकारला धारेवर धरताना तुम्ही कधी अनुभवलं आहे का ? याबाबत तेलंगणातील शेतकरी खरोखरीच भाग्यवान आहेत.
राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या समस्येवर, महत्वाच्या मुद्यावर सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सभागृह दणाणून सोडल्याचा अशात आठवतंय का तुम्हाला ? बरं ते जाऊ द्यात. सर्वसामान्य जनतेच्या अत्यावश्यक गरजांबाबत सभागृहात कधी आमदारांनी वा खासदारांनी फार गहजब केल्याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? तेही राहुद्यात. एखाद्या महत्वाच्या मुद्यावर पक्षभेद विसरून संसदेत सर्वपक्षीय सदस्य एकवटलेत, असं चित्र कधी पाहिलं आहे?
अर्थात लोकप्रतिनिधींच्या पगारी वाढवून घ्यायचा मुद्दा असेल वा त्यांचे हितसंबंधांचा एखादा मुद्दा असेल तर गोष्ट वेगळी. अशावेळी पक्ष, विचारसरणी, आरोप सगळं सगळं विसरून नेते मंडळी एकवटत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर तेलंगणाचे शेतकरी भाग्यवान आहेत, असं विधान केलं त्याला कारणही तसंच आहे.
देशात मुबलक साठा असताना त्याच शेतमालाची आयात असो वा आयातशुल्कात कपात असो, साठवणुकीवरील मर्यादा असोत वा सलग वीजपुरवठ्याची मागणी असो, शेतकऱ्यांच्या अशा अनेक ज्वलंत समस्यावर आपल्याकडं बोलायला आपले लोकप्रतिनिधी फारसे उत्सुक नसतात. तिथे तेलंगणातला सत्ताधारी पक्ष हमीभावासाठी सातत्याने केंद्राशी दोन हात करतो आहे, ही आश्चर्यजनक व सुखद बाब नाही काय ?
ज्या प्रकारे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अन त्यांचे मंत्रिमंडळातील सगळे सहकारी राज्यातल्या भातपिकाला हमीभाव मिळवून देण्याचा प्रयत्न करताहेत. त्यासाठी सततचा पाठपुरावाही केला जातोय. कधी ते स्वतः केंद्र सरकारच्या विविध मंत्र्यांना भेटून संवाद साधताहेत. तर कधी मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला पाठवून हमीभावासाठी केंद्राची मनधरणी करताहेत.
कधी सगळ्या विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या गोष्टी करत अशा मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. अर्थात यातलं राजकारण सोडून द्या. पण राज्यातल्या भातपिकाच्या हमीभावाने खरेदी केली जावी, हा मुद्दा काही सोडायला के. चंद्रशेखर राव आणि त्यांचा TRS तयार नाही.
आताही तेलंगणाच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात एकसमान खरेदी धोरणाचा मुद्दाच उचलून धरण्याचा प्रयत्न केलाय. भातपिकाच्या हमीभावासाठी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यावर जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाबाहेर पडण्याचे धाडसही दाखवले आहे.
लोकसभेत नामा नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. तर राज्यसभेत के. आर. सुरेश रेडडी यांनी सभागृहात या मुद्यावर चौकशी व्हावी, यासाठी प्रयत्न केलेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.