
Rain Water Management : महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून पावसाला पोषक वातावरणाचा अंदाज असला, तरी राज्याच्या बहुतांश भागात उघडीपच आहे. सोयाबीन, कापूस ही दोन मुख्य पिके फुले लागण्याच्या अवस्थेत आहेत. या काळात त्यांना पावसाची गरज असते. पुढील दोन, चार दिवस पाऊस आला नाही, तर या दोन्ही पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट होऊ शकते.
इतर खरीप पिकांनाही पावसाच्या या खंडाचा चांगलाच फटका बसला आहे. सुरुवातीला लांबलेल्या पावसाने पेरण्या बारगळल्या. त्यानंतर जुलै शेवटला झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि आता पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील खासकरून दुष्काळी पट्ट्यातील पिके शेवटची घटका मोजत आहेत. कमी पावसामुळे आडसाली ऊस लागवड क्षेत्रात घट झाली असून, त्यामुळे पुढील गळीत हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जवळपास ३४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. राज्यभरातील दीड हजाराहून अधिक गाव-वाड्या-वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.
जनावरांच्या चारा-पाणीटंचाईनेही उग्र रूप धारण केले आहे. बारामतीसारख्या दुष्काळी भागातून चारा छावण्या काढण्याची मागणी होतेय. दुष्काळी भागातील धरणे ही तळ गाठून असल्याने पुढील शेती हंगामासह उद्योग-व्यवसायही धोक्यात येऊ शकतो.
खरे तर ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर या वर्षी कमी पावसाचा अंदाज होताच. त्यामुळे शासन-प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहनही काही जल तज्ज्ञांनी केले होते. परंतु याकडे नेहमीप्रमाणे शासन-प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम शेतकऱ्यांसह राज्यातील संपूर्ण जनता भोगतेय. जून-जुलै हा अधिक पाऊसमानाचा काळ संपला असून, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तर पावसाचे प्रमाण कमीच असते.
त्यामुळे राज्यभर दुष्काळाच्या झळा वाढणार आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शासन-प्रशासनाने आगामी तीव्र दुष्काळाबाबत योग्य ती पावले उचलायला हवीत. पाण्याची सर्व क्षेत्रांतून वाढत जाणारी मागणी आणि हवामान बदलात कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणामुळे आपले राज्य, देश यांनाच नाही तर जगभर जलसंकटाचा सामना करावा लागतोय. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. २०५० पर्यंत, तर जगभरातील एक अब्ज लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार असल्याचे ‘वर्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’च्या ‘अक्वेडक्ट वॉटर रिस्क ॲटलास’चा (एडब्ल्यूआरए) अहवाल सांगतो.
पृथ्वी या ग्रहावरील पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून देखील आपण त्याचे व्यवस्थापन नीट करीत नाही, अशी खंत ‘डब्ल्यूआरआय’च्या जल कार्यक्रमाच्या प्रमुख यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशात, राज्यात तर जल संवर्धन आणि व्यवस्थापनाची स्थिती फारच भीषण आहे. आपले नैसर्गिक तसेच मानवनिर्मित अनेक जलस्रोत आपण एकतर बंद नाही तर ते अति प्रदूषित केले आहेत.
पडणारा पाऊस हा पाण्यासाठी मुख्य स्रोत असताना त्याचेही नीट व्यवस्थापन आपल्याकडे होत नाही. पडणारे बहुतांश पाणी वाहून जाते. जलसाठ्यांतील थोडेफार पाणी साठविले जाते त्यातील बहुतांश पाणी बाष्पीभवन तसेच गळतीने वाया जाते. शेती असो की उद्योग-व्यवसाय चुकीच्या पाणी वापरानेही बरेच पाणी आपण वाया घालतो. पाण्याच्या पुनर्वापराचा विचार अजूनही आपल्याकडे होत नाही. भविष्यातील तीव्र पाणीटंचाईवर मात करायची असेल, तर आपण जल नियोजन गांभीर्याने घेतले पाहिजे.
प्रथमतः मृत जलस्रोत जिवंत करायला हवेत. नद्यांपासून ते सर्व जलस्रोत प्रदूषण मुक्त करावे लागतील. पडणारे पाणी एकतर जमिनीत मुरवावे लागेल, किंवा जलसाठ्यांत साठवावे लागेल. साठविलेल्या पाण्याचाही शेतकऱ्यांपासून ते उद्योजक अशा सर्वांनी कार्यक्षम वापर होईल, हे पाहायला हवे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.