
अनिल घनवट
Anil Ghanvat article : अनेक दशके लोकसभेत किंवा विधानसभेत फक्त गोंधळ, सभात्याग होताना दिसते. चर्चा मात्र होताना दिसत नाही. चर्चेशिवाय झालेले निर्णय जनतेवर थोपले जातात. यासाठी होणारा सर्व खर्च वाया जातो. जनता कर भरून मरते तरी राज्यकर्त्यांना याचे काही देणे घेणे नाही. देश, राज्य रसातळाला गेले तरी चालेल, पण आपण पुन्हा सत्तेत आलो पाहिजे, हाच फक्त सत्ताधारी पक्षाचा ध्यास असतो. त्यात मतदारांचा, जनतेचा बळी द्यावाच लागतो हे सर्वमान्य झाले असावे. देशाचे पूर्ण राजकारण फक्त काही कुटुंबांच्या हाती गेले आहे.
काही घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात व सत्तेत आहे. यात सर्व पक्षांचे नेते आहेत. लोकशाही जाऊन राजेशाही व्यवस्था सुरू झाली आहे की काय, असा विचार पडतो. भारतातील लोकसभेत व विधानसभेतील लोकप्रतिनिधींपैकी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आमदार खासदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खून व बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि खेदाची बाब म्हणजे ही मंडळी अनेक वेळा निवडून येतात. अशा लोकशाहीची तर जनतेने अपेक्षा केली नव्हती.
पोखरलेला चौथा स्तंभ ः
लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांकडून सुद्धा फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सत्य जनतेसमोर आणण्यापेक्षा ‘टीआरपी’ केंद्रित माध्यमेच पाहायला मिळतात. एका विशिष्ट पक्षाची पाठराखण करण्यातच ते धन्यता मानतात. मुख्य मुद्दा किंवा ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याची जबाबदारीच जणू त्यांना दिली आहे. निर्भीड, सडेतोड पत्रकाराला ते माध्यम सोडून देण्यास भाग पाडले जाते. अशा पत्रकारांवर स्वतःचा यू-ट्यूब चॅनेल काढून मत प्रदर्शित करण्याची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत समाजमाध्यमांची जबाबदारी वाढते. पण त्यात ही विविध पक्षांनी कामाला लावलेल्या पगारी झुंडी या चुकीच्या बातम्या व विरोधकांच्या बनावट, विकृत पोस्ट तयार करून टाकत असतात. सामान्य नागरिकाला नेमके खरे काय अन् खोटे? हे समजणे मुश्किल झाले आहे. पण हेच एक माध्यम आता काही प्रमाणात जनतेच्या हातात आहे, याचा योग्य वापर झाला तरच क्रांती घडू शकते.
भेदभाव आणि जळता देश ः
सत्तेत राहण्यासाठी समाजात फूट पाडून सत्ता मिळविणे व सत्तेत राहणे हे सर्वच राजकीय पक्षांचे धोरण असते. काही कोणाचे लांगूलचालन करतात, काही तुष्टीकरण करतात, काही द्वेषभावना निर्माण करतात. यातून समाजात भेदभाव निर्माण होऊन एक भीतीचे वातावरण तयार होत जाते. सुरक्षिततेसाठी प्रत्येक जातीचे, धर्माचे लोक आपापल्या कळपात घुसून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात. यातून समाजाचे ध्रुवीकरण होते आणि सोबतच मतांचे ही ध्रुवीकरण होत असते. हेच या मंडळींना हवे आहे. सध्या धुमसत असलेले मणिपूर याचेच ताजे उदाहरण आहे.
दोन महिन्यांनंतर समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडिओ हे फक्त हिमनगाचे टोक आहे. असे यापेक्षाही भयंकर अपराध तेथे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दंगेखोरांना हत्यारे पुरवली जातात, दंगे रोखण्यासाठी सरकार काही कठोर पावले उचलत नाही, गुन्हे दाखल होत नाहीत ही फारच गंभीर बाब आहे. मणिपूर जळते आहे, आता हरियाना पेटले आहे, उद्या कदाचित आपला महाराष्ट्र असेल. महापुरुषांवर गरळ ओकून असंतोष निर्माण केला जातोय. हे वेळीच रोखले पाहिजे, नाहीतर पूर्ण आयुष्य दहशतीखाली जगावे लागेल व पुढची पिढी अपराध्यांच्या गुलामीत जगेल. आताच सावध होऊया. एक राजकीय क्रांतीची तयारी करूया.
क्रांती होऊ शकते ः
प्रस्तापित भ्रष्ट, अजागळ व्यवस्था बदलण्यासाठी आता खरंच एका क्रांतीची गरज आहे. देशात अनेक वेळा सत्ता बदल झालेत आणि प्रत्येक वेळी छोटी मोठी क्रांती घडली आहे. ते आता सुद्धा परत घडू शकते. भारतावर दीडशे वर्षे सत्ता गाजविणाऱ्या इंग्रजांना स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीनंतर देश सोडावा लागला. अनेक दशके एकमुखी सत्ता भोगलेल्या काँग्रेसला १९७७ मध्ये सत्ता सोडावी लागली. सत्तेत आलेल्या विरोधकांतील बेबनावामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसला बोफोर्सच्या मुद्द्यावर सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एक रथ यात्रा लाट तयार करू शकते.
एक अण्णा आंदोलन सत्ता पालट करू शकते. आता ही हे परत घडू शकते. गरज आहे प्रामाणिक नेतृत्वाने पुढे येण्याची, हिम्मत दाखवण्याची व जनतेने या प्रामाणिक उमेदवारांना निवडून देण्याची. पुन्हा एकदा विचारधारेवर निवडणूक लढू या. देशातील जनतेला योग्य शिक्षण, सुरक्षा, न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य, जळत्या देशातील भयग्रस्त जनतेला सुखी समृद्ध व निर्भय जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करू या. यासाठी ज्यांनी सिद्ध केले आहेत की ते भ्रष्ट, समाजकंटक, गुन्हेगार आहेत. त्यांना पुन्हा मतदान न करण्याचा, निवडून न देण्याचा संकल्प मतदारांनी करायला हवा.
हे साध्य करण्यासाठी काही रक्तरंजित क्रांतीची गरज नाही. फक्त योग्य व्यक्तीला सत्तेत पाठवण्याची गरज आहे. देशातील सर्व नागरिकांच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताचे धोरण राबविणाऱ्या पक्षाच्या, विचारांच्या व्यक्तींना निवडून द्यायची आवश्यकता आहे. हिंमत दाखवायची आवश्यकता आहे. हे नाही करता आलं तर तुमच्या विद्ववत्तेला, शिक्षणाला काही अर्थ नाही. देशाच्या अधोगतीला व तुमच्या पुढच्या पिढीच्या गुलामीत जगण्याला तुम्हीच जबाबदार असाल हे लक्षात असूद्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.