Rain Forecast : राज्यात दुष्काळाने होरपळ वाढत असतानाच अनेक भागांत पावसाचे पुनरागमन झाले आहे. या पावसाने खरीप हंगामातील बहुतांश पिकांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. सध्याचा पाऊसही सर्वदूर नाही. जिथे पाऊस नाही तिथे पाणीटंचाई जाणवत आहे. या वर्षी अद्यापपर्यंत तरी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) म्हणणे आहे. परंतु पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास पोषक स्थिती निर्माण झाल्याने आजपासून मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत हवामान विभागाला मिळाले आहेत. मॉन्सूनच्या आगमनाची सर्वच जण जशी आतुरतेने वाट पाहत असतात, तसेच तो माघारी कधी फिरणार, याचीही सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबरपासून सुरू होतो आणि एक ऑक्टोबरपर्यंत तो देशातून निघून जाणे अपेक्षित असते. परंतु २०२० पासून आयएमडीने मॉन्सूनच्या परतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
हे नवे वेळापत्रक १९७१ ते २०१९ दरम्यानच्या अद्ययावत माहितीवर आधारित आहे. या नव्या वेळापत्रकानुसार राजस्थानवरून मॉन्सूनच्या परतीची सुरुवात सरासरी १७ सप्टेंबरच्या आसपास होते. ही आधीच्या सरासरी तारखेपेक्षा १५ दिवस उशिराने आहे. या वर्षी मात्र २५ तारीख आली, तरी मॉन्सूनच्या प्रवासाबाबत निश्चित अशी घोषणा आयएमडीकडून झाली नाही.
खरे तर केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन आणि राजस्थानमधून परतीच्या प्रवासाच्या तारखा निश्चित आहेत. तरी पण बहुतांश वेळा या तारखांवर मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात होत नाही. या तारखांच्या आठवडाभर मागे-पुढे आगमन आणि माघार गृहीत धरले जाते. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी तर रब्बीच्या पेरणीची लगबग असते. राज्यात जून ते सप्टेंबर हा पाऊसमानाचा काळ धरून येथील खरीप-रब्बी हंगामासाठीचे पीक नियोजन करण्यात आले आहे.
परंतु मागील काही वर्षांपासून परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात आणि तो बराच काळ (ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत) राज्यावर रेंगाळत असल्याने या दोन्ही हंगामांसाठी तो नुकसानकारक ठरत आहे. परतीचा पाऊस लांबला तर खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन आणि पहिल्या-दुसऱ्या वेचणीचा कापूस भिजतो, तर रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना वरचा पाऊस लाभदायक समजला जात नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकरी परतीचा पाऊस अधिक महत्त्वाचा मानतात. याचे कारण असे, की राज्यातील अनेक भागांतून मॉन्सून परतला तरी येथील पाऊस लगेच बंद होत नाही. वाऱ्यांची दिशा बदलली तरी मॉन्सूनच्या हवेतील आर्द्रता वातावरणात टिकून असते आणि तिचे रूपांतर अधून मधून पावसात होते. पण परतीच्या पावसाचे स्वरूप निराळे असते.
परतीच्या पावसाचे ढग स्थानिक असतात. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असतो. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जेथे खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नाही, तिथे परतीच्या पावसाच्या ओलाव्यावरच रब्बी पिके घेतात. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा निश्चित अंदाज शक्य तितका लवकर मिळावा, अशी अपेक्षा असते. गंभीर बाब म्हणजे मॉन्सूनच्या आगमनाविषयी जितके संशोधन झालेले आहे तितके मॉन्सूनच्या परतीविषयी झालेले नाही. परतीच्या मॉन्सूनचे महत्त्व लक्षात घेता याच्या बदलता पॅटर्नबाबत आयएमडीने संशोधन, अभ्यास वाढवायला हवा. अशा अभ्यासातून परतीच्या पावसाबाबत निश्चित अंदाज आयएमडीला देता येईल. राज्याच्या कृषी विभागाने देखील परतीच्या पावसाच्या या बदलत्या पॅटर्ननुसार खरीप-रब्बी पीकपद्धती तसेच विविध पिकांच्या पेरण्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.