‘क्यूआर कोड’ने जग बनतेय एक शाळा

युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर अॅवॉर्डसोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजित डिसले यांना नुकताच जाहीर झाला आहे. तब्बल सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार आहे. डिसले यांच्या नेमक्या कोणत्या कार्याची दखल संबंधित संस्थांनी पुरस्कार जाहीर करताना घेतली ते पाहूया...
agrowon editorial article
agrowon editorial article

लंडनस्थित वार्की फाउंडेशच्या माध्यमातून जगभरातील शिक्षकांना ग्लोबल टीचर्स अॅवॉर्ड दिला जातो. सुरुवातीला जगभरातून आलेल्या अर्जातून ज्यूरीच्या माध्यमातून ५० शिक्षकांची निवड केली जाते. ५० मधून १० आणि १० मधून शेवटी एकाचीच या पुरस्कारासाठी निवड होते. २०१९ मध्ये याकरिता साडेबारा हजार नामांकन प्राप्त झाले होते. सुरुवातीच्या ५० जणांमध्ये डिसले यांच्यासह भारतातील अजून दोन शिक्षकांचा समावेश होता.   डिसले यांची मानसिकता एका शाळेपुरता अथवा एका वर्गापुरता शिकविणारा शिक्षक अशी कधीच नव्हती. जग हीच माझी शाळा, असे त्यांना वाटत असे. जगामध्ये जिथे जिथे शिक्षण पोहोचले नाही, त्या मुलांपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असे. खरे तर याची सुरुवात २०१४-१५ मध्ये झालेली आहे. ज्या वेळी जगभरातील अशा अनेक उपक्रमशील शिक्षकांची ओळख त्यांना झाली. डिसले यांनी ‘क्यूआर कोड’ची पुस्तके तयार केली आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील ३०० इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये निवडले गेले. तो प्रोजेक्ट सादर करण्यासाठी टोरॅंटोत आमंत्रित केले. त्या वेळी त्यांना जगभरातील अनेक शिक्षकांशी ओळख झाली. त्यानंतर एकमेकांच्या ओळखीतून प्रयोगांचा प्रसार होत गेला. आजघडीला १७० देशांतील प्रयोगशील शिक्षक एकमेकांशी जोडले गेले असून, ते स्वःतचे प्रयोग सांगत असतात. आपल्या काही अडचणी ते सांगत असतात. अशाप्रकारे ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या शाळेतील मुलांना जगभरातील अनेक ठिकाणांची ओळख ते करून देतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका वर्गामध्ये आपण अवघे जग आणू शकतो. आणि बसल्या जागी आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, असा डिसले यांचा अनुभव आहे. 

आतापर्यंत डिसले यांनी ८३ देशांतील १५२१ शाळांतील जवळपास ८६ हजार ५१३ विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल फिल्डच्या माध्यमातून शिकविले आहे. अशा शिक्षणाच्या माध्यमातून ते जगातील प्रत्येक खंडात पोहोचलो आहेत. या शिक्षणाची सुरुवात मुलांना संभाषित कौशल्याचा सराव देण्यापासून झाली. संवाद साधण्याबाबत शिकविले गेले. अनोळखी व्यक्तीस कसे बोलावे, शब्दप्रयोग नेमके कसे करावेत. मुले चुकत असतात, पण त्या चुकण्यातूनच शिकत असतात. चुकणे आणि त्यातून शिकणे, हेच त्यांना करायचे होते. क्यूआर कोडच्या माध्यमातून शिकविताना भाषेचा अडसर येत नाही, बोलणाऱ्यांच्या हावभावावरून त्यांचा संदेश पोहोचत असतो.पहिल्यांदा कयूआर कोडचे बालभारतीचे पुस्तक त्यांनी तयार केले. या पुस्तकाच्या प्रत्येक धड्यासाठी, एवढेच नाही तर प्रत्येक पानासाठी क्यूआर कोड तयार केले आहेत. दीक्षा अॅपवरून संबंधित धड्याचा क्यूआर कोड स्कॅन केला, की त्या धड्याबाबतचा ‘डिजिटल कंटेन्ट’ (पीपीटी, व्हिडिओ, ऑडिओ, इमेजेस) मिळतो. त्यांनी जी पुस्तके तयार केली आहेत ती ‘डायनॅमिक कयूआर कोड’ची आहेत. म्हणजे प्रत्येक मुलगा स्वःतच्या गतीने शिकतो की नाही, हे या पुस्तकांद्वारे ‘मॉनिटर’ करता येते. म्हणजे एखाद्या मुलाने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तो संबंधित व्हिडिओ पाहतो. त्यानंतर त्यास प्रश्‍नपत्रिका मिळते. त्या मुलाच्या उत्तर पत्रिकेवरून त्यास तो घटक अथवा धडा समजला की नाही, हे त्यालाही कळते आणि शिक्षकालाही कळते. विद्यार्थ्याला एखादा घटक समजला नाही, तर त्या विषयाशी संबंधित वेगळ्या ‘कंटेन्ट’चा क्यूआर कोड त्यास मिळतो. त्यावरून तो दुसरा ‘कंटेन्ट’ पाहू शकतो. अशाप्रकारे जोपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला तो विषय पूर्णपणे समजत नाही, तोपर्यंत तो शिकत राहतो. 

पूर्वी शाळेत मोबाईलवर बंदी होती. परंतु कोरोना लॉकडाउनमुळे मागील जवळपास वर्षभरापासून शाळा बंद असताना मोठ्या शहरांमध्ये मोबाईलवरच अनेक ऑनलाइन शाळा सुरू आहेत. डिसले यांनी तर क्यूआर कोडच्या माध्यमातून आधीच ऑनलाइन शिक्षण सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउनमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. खेड्यातील शाळांमधून ऑनलाइन शिक्षणही सुरू नाही. अशावेळी क्यूआर कोड तंत्राने ग्रामीण भागातील मुलांनाही शिकते ठेवले आहे. लॉकडाउन काळात त्यांनी मुलांचे छोटे छोटे गट करून त्यांना वेगवेगळे प्रकल्प दिले होते. एक गट प्रत्येक दिवशी किती विजेचे युनिट वापरले याच्या नोंदी घेत होता. दुसरा गट पाण्याचा वापर किती झाला हे पाहत होता. तर तिसरा गट गावातील प्रदूषणाची दररोज नोंदी घेत होता. चौथा गट तापमान नोंदवत होता. या माहितीच्या आधारे तापमानातील वाढीचा आणि पाणी वापराचा काही संबंध आहे का, त्याचा विजेच्या वापरावर काही परिणाम होतो का, विशिष्ट एखाद्या दिवशी प्रदूषण कमी का होते, याचा अभ्यास त्यांनी केला. विशेष म्हणजे या माहितीच्या आधारे पावसाळ्याच्या तोंडावर गावात उपलब्ध पाणीसाठ्यांवरून हे पाणी किती दिवस पुरेल, याबाबतचा आराखडा मुलांनी तयार केला. गावाचा ग्रीन मॅपही तयार केला. या पद्धतीने मुलांची वाटचाल ‘ग्लोबल सिटिझन’ बनण्याकडे असून हे शिक्षण भविष्यात क्रांती घडवू शकते. 

२०१४ मध्ये राज्य शासनाने क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षणाचा हा प्रकल्प स्वीकारला. डिसले यांनी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांना तसा प्रस्ताव दिला होता. २०१५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड वापरण्यात आले. त्याच वर्षी त्याचे फायदेही शासनाच्या लक्षात आले  त्यास पालकांचाही खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. २०१६ पासून बालभारतीची सर्व पुस्तके आता क्यूआर कोडमधूनच प्रकाशित केली जातात. २०१९ पासून एनसीईआरटीने देखील सर्व पुस्तके क्यूआर कोडमध्ये आणायला सुरुवात केली आहे. आता तर महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पश्‍चिम बंगाल या राज्यांनीही क्यूआर कोडची पाठ्यपुस्तके वापरायला सुरुवात केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे पुरस्काराच्या रूपात त्यांना मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी निम्मी रक्कम ते अंतिम फेरीत निवड झालेल्या नऊ सहकाऱ्यांना देणार आहेत. शिवाय त्यांना मिळालेली पुरस्कार रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करिता वापरणार आहेत. त्यामुळे देशात, राज्यात शिक्षणातील नवोपक्रमशीलतेला चालना मिळणार आहे. 

- हेरंब कुलकर्णी (हा लेख शिक्षण गप्पा कार्यक्रमात हेरंब कुलकर्णी यांनी रणजित डिसले यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर आधारित आहे.) (लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com