फ्यूचर्स किमती ः सप्ताह १० ते १६ ऑगस्ट २०२४
या सप्ताहात हळद व सोयाबीन यांच्या किमती उतरल्या. सोयाबीनच्या किमतीने ऑक्टोबर २०२३ नंतर पुन्हा एकदा नीचांकी पातळी गाठली आहे. टोमॅटोच्या किमतीसुद्धा वाढत्या आवकेमुळे घसरल्या आहेत.
कापसाच्या किमती मार्चमध्ये रु. ६१,५८० पर्यंत गेल्या होत्या. त्यानंतर त्या घसरत आहेत. सोयाबीनप्रमाणेच कापसाच्या किमतीसुद्धा आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात. या महिन्यात अमेरिकी शेती खात्याने (यूएसडीए) प्रकाशित केलेल्या ‘Cotton and Wool Outlook’(https://www.ers.usda.gov/webdocs/outlooks/१०९७१३/cws-२४h.pdf?v=९१३८.४) अहवालात या वर्षीच्या (ऑगस्ट २०२४ – जुलै २०२५) उत्पादनाचे अंदाज दिलेले आहेत.
त्यानुसार या वर्षी कापसाचे जागतिक उत्पादन ३.५ टक्क्यांनी वाढेल; २०१९-२० नंतरचे ही सर्वोच्च उत्पादन असेल. मुख्यतः या वाढीस ब्राझील व अमेरिकेतील वाढते उत्पादन जबाबदार असेल. यामुळे जागतिक वर्षअखेर साठासुद्धा २.४ टक्क्यांनी वाढलेला असेल व तोही गेल्या पाच वर्षांतील सर्वांत मोठा साठा असेल. त्यामुळे कापसाच्या जागतिक किमतीसुद्धा लागोपाठ तिसऱ्या वर्षी घसरतील. या अहवालानुसार भारतातील उत्पादन या वर्षी ६.५ टक्क्यांनी घसरेल.
१६ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. ५७,०२० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.५ टक्क्याने घसरून रु. ५६,६८० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव ०.५ टक्क्याने वाढून रु. ५६,८३० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५७,९०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.२ टक्क्यांनी अधिक आहेत.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १.६ टक्क्याने वाढून रु. १,५१९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५५० वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५७८ आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यांसाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यांसाठी रु. ७,५२१ आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. २,५५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. २,५८५ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५६८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. २,५९६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ०.५ टक्क्याने अधिक आहे. मक्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही; मात्र हेजिंगसाठी या किमतींवर लक्ष ठेवावे. मक्याचा हमीभाव रु. २,२२५ आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १६,२०२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. १६,०८२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. १६,०७२ वर आल्या आहेत. डिसेंबर किमती रु. १६,५३८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ७,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १३.४ टक्क्यांनी वाढून रु. ७,८५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे; भाव वाढत आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.९ टक्क्याने घसरून रु. ८,२२५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक कमी होऊ लागली आहे.
सोयाबीन
या सप्ताहातसुद्धा सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.७ टक्क्याने घसरून रु. ४,३६८ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. किमतीतील उतरता कल कायम आहे; गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोयाबीन रु. ४६४६ वर आला होता, त्यानंतर एक महिना किमती वाढत त्यांनी रु. ५,३०१ ची पातळी गाठली. नंतर मात्र त्या सतत उतरत आहेत. या सप्ताहातील किंमत ही त्यानंतरची सर्वांत कमी किंमत आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,२३३ वर आली होती. या सप्ताहात ती २ टक्क्यांनी वाढून रु. १०,२८५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.