Agriculture Commodity Market : शेतीमाल बाजारपेठेतील मंदीवर अमेरिकेचे शिक्कामोर्तब

Agriculture Commodity Market Recession : अर्थात जगातील कृषी बाजारपेठ उलट-पुलट करण्याची क्षमता असणारा हा अहवाल दोन वर्षांच्या विक्रमी तेजीनंतर मंदीदर्शक असणार, अशी बाजाराची अपेक्षा होतीच. परंतु प्रत्यक्ष अहवाल आणि त्यातील आकडे हे अपेक्षेपेक्षा जास्तच मंदी-पोषक असल्याने मागील आठवड्यात अमेरिकी बाजारात त्याचे पडसाद उमटले.
Agriculture Commodity
Agriculture CommodityAgrowon
Published on
Updated on

Agriculture Commodity Market : मागील आठ-दहा आठवडे आपण भारतातील कृषी बाजारपेठेवर आलेल्या एल-निनो संकटाची वारंवार चर्चा करीत आलो आहोत. वास्तविक एल-निनो हे दुहेरी संकट आहे.

कारण त्यातून एकीकडे भारतातील अन्नधान्य उत्पादनात घट येण्याची शक्यता असली तरी त्याचवेळी पाश्चिमात्य कृषिबहुल देशांत अन्नधान्य उत्पादनात भारताच्या तुलनेत कित्येक पटीने भरघोस वाढ होऊ शकते. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे बाजाराच्या किल्ल्या दीर्घ काळासाठी मंदीवाल्यांकडे राहतात.

याच शृंखलेत मागील आठवड्यात आपण तेलबिया आणि खाद्यतेल बाजारपेठेत असलेल्या मंदीवर उपाययोजना म्हणून ताबडतोब आयात शुल्क आणि कृषी अधिभार वाढवण्याची गरज असल्याचे पाहिले. कारण खाद्यतेलाच्या किरकोळ बाजारातील किमती निम्म्यावर आल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन, मोहरीच्या भावात घसरण दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर अलीकडेच अमेरिकी कृषी खात्याचा (यूएसडीए) मे महिन्यासाठीचा जागतिक शेतीमाल मागणी-पुरवठा अंदाज अहवाल प्रसिद्ध झाला. २०२३-२४ वर्षातील मागणी-पुरवठा अंदाज देणारा हा पहिलाच अहवाल असल्याने त्याबाबत संपूर्ण जगाला त्याची उत्सुकता होती.

अर्थात जगातील कृषी बाजारपेठ उलट-पुलट करण्याची क्षमता असणारा हा अहवाल दोन वर्षांच्या विक्रमी तेजीनंतर मंदीदर्शक असणार, अशी बाजाराची अपेक्षा होतीच. परंतु प्रत्यक्ष अहवाल आणि त्यातील आकडे हे अपेक्षेपेक्षा जास्तच मंदी-पोषक असल्याने मागील आठवड्यात अमेरिकी बाजारात त्याचे पडसाद उमटले.

सोयाबीन शुक्रवारअखेर १४ महिन्यांतील किमान पातळीवर बंद झाले. मका १६ महिन्यातील सर्वात कमी किमतीवर तर गहू दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. एकंदरीत मागील दोन-तीन महिने आपण सातत्याने मांडत असलेल्या भूमिकेवर अमेरिकी कृषी खात्याने एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.

Agriculture Commodity
Agriculture Commodity Prices : शेतीमाल दराचे वास्तव

सोयाबीन

२०२३-२४ या हंगामाकरिता सोयाबीन उत्पादनाच्या अनुमानामध्ये अपेक्षेपेक्षा भरघोस वाढ दर्शवली गेली आहे. केवळ अमेरिकेमध्ये उत्पादन १२३ दशलक्ष टन एवढे अंदाजित केले गेले आहे. मागील वर्षात ते ११६ दशलक्ष टन होते.

तर जागतिक सोयाबिन उत्पादन ४१० दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षात ते ३७० दशलक्ष टन एवढे होते. म्हणजे सुमारे ४१ दशलक्ष टन पुरवठा वाढ अपेक्षित आहे. यामध्ये अमेरिकेत ७ दशलक्ष टन, ब्राझीलमध्ये 8 दशलक्ष टन, अर्जेंटिनात २१ दशलक्ष टन एवढी वाढ अपेक्षित आहे.

पुरवठ्याच्या तुलनेत मागणीतील वाढ खूपच कमी म्हणजे १४ दशलक्ष टनांची आहे. म्हणजे उत्पादनात १० टक्क्याहून अधिक वाढ आणि मागणीमध्ये मात्र ४-५ टक्केच वाढ दिसत आहे. त्यामुळे पुढील वर्षाअखेर सोयाबीनचे शिल्लक साठे १२२ दशलक्ष टन एवढे अंदाजित केले आहेत. मागील वर्षी १०१ दशलक्ष टन शिल्लक साठा होता.

बाजार धुरीण शिल्लक साठे १०८ दशलक्ष एवढे धरून चालले होते. त्यापेक्षा हा आकडा खूपच जास्त आहे. पुरवठ्यातील वाढीमागील मुख्य कारण आहे अर्थातच चांगल्या पावसाची आणि हवामानाची अपेक्षा. एल निनो वर्षात अमेरिका खंडामध्ये पाऊसमान वाढत असते.

या स्तंभातून सोयाबीनचे उत्पादन ७ टक्के वाढण्याचा अंदाज सतत व्यक्त केला जात होता. परंतु पहिला अहवाल १० टक्के वाढ अनुमानित करीत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मंदी वाढण्याची शक्यता अधिक ठळक झाली आहे.

या अहवालात पुढील हंगामातील सोयाबीन आणि सोयापदार्थांच्या किंमतीबाबतचे अंदाज हेच दर्शवत आहेत. सोयाबीनची सरासरी किंमत १४ डॉलर

प्रतिबुशेल वरून १२ डॉलर एवढी घटवली गेली आहे; तर सोयामील आणि सोयातेल किंमत अनुमान अनुक्रमे ९० डॉलर प्रति टन (सुमारे २०%) आणि ६ सेंटस प्रति पौंड (सुमारे १०%) एवढी घटवली आहे.

अमेरिकेत भाव मजबुती असताना भारतात मात्र सोयाबीन मागील तीन महिन्यांहून अधिक काळ किंचित मंदीतच राहिले आहे. आता तर ५,००० रुपयांची आधारपातळी देखील मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही म्हणायला खाद्यतेल आयातीचा महापूर थांबत नसला तरी सोयामील निर्यात वाढ जोरदार असल्यामुळे ही पातळी टिकून राहू शकली.

Agriculture Commodity
Agricultural Commodity Market : शेतीमाल बाजाराची दिशा काय राहू शकते?

मका

मक्याच्या उत्पादनातील वाढ तर नवीन उच्चांक नोंदवेल असे अनुमान आहे. एकट्या अमेरिकेमध्येच मक्याचे उत्पादन सुमारे ४० दशलक्ष टन एवढे वाढण्याचा अंदाज आहे. तर अर्जेंटिना आणि युरोपमध्ये अनुक्रमे १७ दशलक्ष टन आणि ११ दशलक्ष टन एवढी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनप्रमाणे पुरवठ्यातील वाढीच्या प्रमाणात मागणी वाढणार नसल्यामुळे शिल्लक साठे देखील वाढून १६ दशलक्ष टनांनी वाढून ३१६ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

जगाला मक्याचा पुरवठा करणारा मुख्य देश युक्रेन आणि काळा समुद्र प्रांतांतून होणाऱ्या मक्याच्या पुरवठ्यामध्ये थोडी कपात दाखवली गेली असली तरी ती मोठ्या प्रमाणात वाढली किंवा कपात न होता उलट परिस्थिती निर्माण झाली तर बाजारात अधिक चढ-उतार संभवतात. परंतु या जर-तरच्या गोष्टी असून त्याचा परिणाम पुढील हंगामाच्या मध्यावर जाणवेल.

कापूस

अमेरिकी कृषी खात्याचा अहवाल कापसाच्या बाबतीत तुलनेने बरा आहे. मागील काही महिने कापसाच्या मागणीमध्ये दीर्घकालीन घटीचा अंदाज व्यक्त केला जात होता.

व्याजदर वाढीमुळे जागतिक पातळीवरील औद्योगिक मंदीचा फटका वस्त्रोद्योग क्षेत्राला देखील बसल्यामुळे ही मागणी कमी होत जाण्याचा अंदाज होता.

त्या तुलनेने या अहवालात जागतिक आणि अमेरिकी बाजारात आर्थिक परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा होऊन कापसाच्या मागणीत ५% वाढ अपेक्षित केली आहे. तसेच अमेरिकेतील या हंगामातील शिल्लक साठे अपेक्षेपेक्षा खूपच कमी दाखवले आहेत.

एकंदरीत पाहता पुढील हंगामात कापसाचे क्षेत्र घटणार असले तरी उत्पादनात किंचित वाढ होण्याची चिन्हे आहेत. मागणीतील वाढ अधिक असल्यामुळे कापसाची किंमत सोयाबीन आणि मका यांच्या तुलनेत मजबूत राहील, असेही या अहवालातून सूचित होते.

भारतातील परिस्थिती

वरील आकडेवारीचा भारतातील बाजारांवर परिणाम जशास तसा होतोच असे नाही. याची प्रचिती मागील तीन-चार महिन्यात आपल्याला आलेली आहे. मका अमेरिकेत मोठ्या मंदीमध्ये आला तरी येथे तेवढीच मंदी येईल असे नाही.

कारण केंद्र सरकार इथेनॉल वापराचे उद्दिष्ट पार करण्यासाठी पुढील वर्षात मक्यापासून ऊर्जा निर्माण करण्याच्या धोरणाचा स्वीकार मर्यादित स्वरूपात का होईन पण करू शकेल.

कारण कमी पाऊसमानाच्या वर्षात आणि साखरेचे शिल्लक साठे दोन महिन्यांच्या गरजेएवढेच शिल्लक राहण्याचे सुधारित अनुमान असल्यामुळे उसापासून इथेनॉल निर्मितीमध्ये घट येईल. त्यामुळे मग मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना दिली जाऊ शकते. असे झाल्यास मक्याची किंमत सुधारेल.

सोयाबीनच्या किमतीतील चढ-उतारासाठी पाम तेल आणि खनिज तेल हा सर्वात मोठा घटक ठरेल. पामतेल एल-निनो वर्षात मजबूत राहते तर ओपेक पुढील काळात तेलउत्पादन घटवणार आहे.

तसेच दुसऱ्या सहामाहीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा पाहता खनिज तेल ९० डॉलर प्रतीपिंप झाल्यास आपल्याला मंदीच्या झळा तेवढ्या बसणार नाहीत अशी आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com