

डॉ. हेमलता पोपेरे, डॉ. रणजित इंगोले, डॉ. सुनील हजारे
Animal Care : घटसर्प हा जिवाणूजन्य आजार असून, पावसाळ्यामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. या आजाराची बाधा झाल्यावर जनावरामध्ये अतितीव्र आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावर दगावते. त्यामुळे योग्यवेळी लक्षणे ओळखून उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कमी झालेले तापमान, हवेतील वाढलेली आर्द्रता अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी इत्यादींची वाढ झपाट्याने होते. गोठ्यातही कायम ओलसरपणा असतो. पावसाळ्यात अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरे विविध रोगांना बळी पडतात. त्यामुळे या काळात गोठ्याची स्वच्छता, रोगप्रतिबंधात्मक लसीकरण, जंतनाशकांचा वापर, सकस आहाराचे योग्य प्रकारे नियोजन करून जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजारांपैकी ‘घटसर्प’ हा एक महत्त्वाचा आजार आहे. हा एक जिवाणूजन्य आजार असून, त्याला गळासूज असेही म्हटले जाते.
हा सांसर्गिक आजार ‘पास्चुरेल्ला मल्टोसिडा’ नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने गाई, म्हशींमध्ये दिसत असला, तरी शेळ्या, मेंढ्या आणि डुकरांमध्ये देखील दिसून येतो. या व्यतिरिक्त घोडे, उंट, याक, गाढव आणि हत्तींमध्ये देखील आजाराचा संसर्ग होऊ शकतो. साधारणतः म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. लहान वासरे या आजाराला लवकर बळी पडतात. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसांत आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. आजाराची बाधा झालेल्या जनावरांमध्ये मरतुक होण्याची शक्यता अधिक असते.
प्रादुर्भाव व प्रसार ः
- हा आजार पास्चुरेल्ला मल्टोसिडा नावाच्या जिवाणूमुळे होतो. हे जिवाणू गाई, म्हशींच्या टॉन्सिल्स व नेझोफॅरीनक्समध्ये नैसर्गिकरीत्या आढळून येतात. मात्र निरोगी जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती या जिवाणूंची संख्या नियंत्रणात ठेवतात. जनावरांच्या नाक आणि तोंडातील स्रावाद्वारे हे जिवाणू शरीराबाहेर टाकले जातात.
- आजारी जनावरांच्या नाक-तोंडातील स्रावातून हे जिवाणू वैरण, खाद्य, पाणी किंवा पशुपालनात वापरण्यात येणाऱ्या उपकरणे इत्यादींना जिवाणू संसर्ग होऊन अप्रत्यक्ष प्रसार होतो. आणि निरोगी जनावरे आजारास बळी पडतात.
- आर्द्रतायुक्त वातावरणात हे जिवाणू दीर्घ काळ तग धरू शकतात.
- आजारी किंवा वाहक जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्कानेही आजाराचा प्रसार होतो.
- साधारणतः पावसाळ्याच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र इतर ऋतूमध्ये सुद्धा आजाराचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.
- जनावरांवर ताण आल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने किंवा ताण आल्यामुळे जनावर आजारास लगेच बळी पडते.
- जनावरांना ताण येण्यामागे बरेच घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये वातावरणात अचानक होणारा बदल आणि अति उत्पादनक्षमता हे महत्त्वाचे घटक आहेत. उच्च तापमान आणि अति आर्द्रता यासारखे वातावरणीय बदल जनावरांमध्ये जास्त ताण उत्पन्न करतात. याशिवाय लांब पल्ल्याचा प्रवास, इतर आजार, जंत किंवा गोचिडीचा प्रादुर्भाव, रक्तक्षय, अपुरे पोषण देणे, अधिक दूध उत्पादन आणि अत्याधिक श्रमामुळे देखील जनावरांमध्ये ताण येतो. ताण आल्यानंतर जनावर या आजाराला बळी पडण्याची शक्यता वाढते.
...असा होतो आजार
- हे जिवाणू संवेदनशील जनावराच्या शरीरात गेले की ते टॉन्सिल्स आणि गळ्यातील उतींमध्ये वाढतात. त्यानंतर ते बाधित जनावराच्या रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करतात. परिणामी, जनावरांना ताप येतो.
- रक्तावाटे जिवाणू शरीराच्या इतर भागातील उतींमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी त्यांची झपाट्याने वाढ होते. जिवाणूने
स्रवलेल्या विषारी द्रव्यांमुळे विविध अवयवामधील उतींना इजा निर्माण होते. ही द्रव्ये शरीरभर पसरून जनावरास अत्याधिक ताप येतो.
- या आजारात प्रामुख्याने जनावरांच्या वरच्या श्वसनमार्गावर वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे श्वसनसंस्था पूर्णपणे प्रभावित होऊन जनावरांच्या श्वासोच्छ्वास करण्यास अडचण येते. हा घात सहन न झाल्याने बाधित जनावर अचानक कोलमडते व मृत्यू पावते.
लक्षणे ः
आजाराची लक्षणे दिसण्यास बाधा झाल्यापासून साधारणतः एक ते तीन दिवस लागतात. यामध्ये अतितीव्र आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात.
१) अतितीव्र ः
- या प्रकारात लक्षणे दिसण्याच्या चोवीस तासांच्या काळात मृत्यू येऊ शकतो.
- जनावरांना ताप येणे, हगवण लागणे, गळ्याला सूज इ. लक्षणे दिसतात. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावर दगावते.
२) सौम्य ः
- अचानक ताप येतो. ताप १०६ ते १०७ अंश फॅरानहाइटपर्यंत जातो.
- बाधित जनावरांचे डोळे लाल होतात. जनावर अस्वस्थ होते, भूक मंदावते. हालचाल कमी होते, पोटात दुखते, हगवण लागते.
- गळ्याला सूज येऊन खाण्यास व गिळण्यास त्रास होतो.
- मान, डोके किंवा पुढील पायांना सूज येणे. मानेच्या भागातील लसिका ग्रंथींना सूज येते.
- जनावरांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. घशातून घरघर आवाज येतो.
- बाधित जनावराचे नाक वाहू लागते. जनावराला छातीत खूप वेदना होतात.
- जीभ कोरडी पडून बाहेर येते. परिणामी, जनावर तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करते.
- वेळेत उपचार न केल्यास बाधित जनावरे १४ ते ४८ तासांत दगावतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना ः
- या आजारावर औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब हाच जनावरांना वाचविण्याचा उपाय आहे.
- दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (एप्रिल- मे महिन्यांत) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
- लहान वासरांना सहा महिने वयाची असताना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा तीन महिन्यांच्या फरकाने द्यावी. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यावी.
- लसीकरणापूर्वी कृमिनाशक औषधे व परजीवी कीटकांचे निर्मूलन करावे. जेणेकरून लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतात.
- जनावरांना संतुलित आहार द्यावा. जेणेकरून जनावरांमध्ये योग्य प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल.
- जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.
- पावसाळ्यात जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये.
- बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. त्यांचे खाद्य-पाणी व्यवस्थापन स्वतंत्र करावे.
- पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, जनावर दगावण्याची शक्यता असते.
- मरतुक झालेल्या जनावराची जमिनीत खोलवर पुरून किंवा जाळून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.
रोगनिदान ः
जनावरांमध्ये वरील दिसणाऱ्या लक्षणांवरून रोगाचे निदान करता येते. तसेच आजारी जनावराच्या रक्त नमुन्यांची प्रयोगशाळेतून तपासणी करून रोगनिदान करता येते. मृत्यू झालेल्या जनावराचे शवविच्छेदन करून रोगनिदान करता येते.
------------------------
- डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४
(विभागप्रमुख, पशुविकृती शास्त्र विभाग,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.