Goat Breeding : शेळ्यातील पैदास पद्धतीचे तंत्र

Goat Farming : गट प्रजनन प्रणाली, न्यूक्लियस प्रजनन प्रणाली, आउट क्रॉसिंग, इनब्रीडिंग या सर्व पैदास पद्धती शेळ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उत्कृष्ट प्रतीच्या शेळ्या, बोकडाची वंशवृद्धी करण्यासाठी कधी इनब्रीडिंग करावे लागते. आनुवंशिक दर्जा वाढविण्यासाठी आउट क्रॉसिंग करावे लागते.
Konkan kanyal goat breeds
Konkan kanyal goat breedsAgrowon

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. संदीप कोमटवर
Goat Rearing : गट प्रजनन प्रणाली, न्यूक्लियस प्रजनन प्रणाली, आउट क्रॉसिंग, इनब्रीडिंग या सर्व पैदास पद्धती शेळ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उत्कृष्ट प्रतीच्या शेळ्या, बोकडाची वंशवृद्धी करण्यासाठी कधी इनब्रीडिंग करावे लागते. आनुवंशिक दर्जा वाढविण्यासाठी आउट क्रॉसिंग करावे लागते.

प्रत्येक शेळीमध्ये आनुवंशिक संरचनेमध्ये भिन्नता असते. त्यामुळे पैदाशीकरिता निवड पद्धतीचा अवलंब करता येतो. पशुपालकांच्या गरजेनुसार योग्य तो गट प्रजनन प्रणाली किंवा न्यूक्लियस प्रजनन प्रणालीचा अवलंब करू शकतो.
इनब्रीडिंग ः
- इन्ब्रीडिंग म्हणजे पशुंमध्ये जवळच्या नात्यात (जसे नर- संतती, मादी- पुत्र, भावंडं) प्रजनन. उत्कृष्ट प्रतीच्या शेळ्या, बोकडांची वंशवृद्धी करण्यासाठी या पैदास प्रकाराचा अवलंब करतात. यामध्ये एकाच जातीच्या शेळ्यांचे नर, माद्या वापरतात. त्यांच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म वाढवता येतात.
अ) लाइन ब्रीडिंग ः या पद्धतीत उत्कृष्ट प्रतीचा बोकड परत परत (नात, मुलगी, आईबरोबर समागम करून) वापरला जातो. उत्कृष्ट बोकडाची वंशवृद्धी झपाट्याने करण्यासाठी याचा फायदा होतो.
ब) क्लोज ब्रीडिंग ः या पद्धतीत कुटुंबामध्ये प्रजनन केले जाते. उदा. आई-मुलगा, वडील-मुलगी. एकाच शेळीची दोन नर- मादी पिले इ.

इनब्रीडिंग पैदास पद्धतीचे काही तोटे ः
१) कळपात इनब्रीडिंग वाढल्यास अप्रगत असलेली जनुके व्यक्त होतात. ही जनुके शारीरिक वाढ, पुनरुत्पादन, उत्पादनक्षमता या घटकांवर विपरीत परिणाम करतात.
२) काही पिढ्यांनंतर करडांचे वजन वाढण्याची क्षमता कमी होते. उत्पादनात घट होते कारण पिलांच्या मरतुकीचे प्रमाण वाढते, पिलाची वाढ पाहिजे तशी होत नाही.
३) आनुवंशिक आजार पुढच्या पिढीत जातात. पशुधन अंशतः वंध्यत्व पावते.

आउट ब्रीडिंग ः
या पद्धतीत नाते संबंध नसणाऱ्या शेळ्यांचे प्रजनन होते. या पद्धतीमुळे विविध प्रकारच्या जनावरांचे समागम होते. जास्त चपळ, जास्त उत्पादन क्षमता असलेली संतती जन्माला येते.आउट ब्रीडिंग हे आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग या दोन प्रकारे घडवून आणता येते.
अ) आउट क्रॉसिंग ः
- एकाच जातीचे पण वेगवेगळ्या ठिकाणचे ज्यांच्यामध्ये काहीही नातेसंबंध नाही असे उत्तम आनुवंशिकता व उत्पादनक्षमता असणारे नर आणि मादी यांची पैदास केली जाते.
ब) क्रॉस ब्रीडिंग ः
- या पद्धतीत दोन जातींचे उत्तम उत्पादनक्षमता असणारे नर, मादी यांचा संकर केला जातो. उदा. उस्मानाबादी आणि संगमनेरी.
- योग्य प्रमाण व योग्य जाती असतील तरच अशी करडे उत्तम उत्पादन देतात. नाहीतर पुढच्या पिढ्यांमध्ये अनावश्यक नियंत्रित आनुवंशिकता न आल्यास पुढच्या पिढ्यांमध्येही उतादनक्षमता घटते. त्यामुळे नवीन पैदास झालेली पिले चांगले अपेक्षित उत्पन्न देण्यास अकार्यक्षम ठरू शकतात.

Konkan kanyal goat breeds
Livestock Breeding : पशुधन पैदास धोरणात सुधारणा हव्यात

एकच नर सातत्याने वापरण्याचे दुष्परिणाम ः
- नरात काही आनुवंशिक दोष असल्यास तो करडात येतात.
- कळपामध्ये इनब्रीडिंग वाढते.
- अप्रगत असलेली जनुके व्यक्त होतात. ही जनुके ही शारीरिक वाढ, पुनरुत्पादन, उत्पादनक्षमता या घटकांवर विपरीत परिणाम करतात.
- काही पिढ्यांनंतर कळपातील करडांची वजन वाढण्याची क्षमता कमी होते.

गट प्रजनन प्रणाली ः
- या प्रणालीमध्ये एका गावातील ५ ते ७ जणांच्या कळपात नराची अदलाबदल केली जाते. प्रजनन काळात आळीपाळीने एका कळपातील जातिवंत नर हा वेगवेगळ्या कळपात प्रजननासाठी पाठवण्यात येतो.
- नर बदलाने कळपातील इन्ब्रीडिंग टळते. नवीन नराची जनुके कळपात येतात. पुढील पिढी अधिक समृद्ध होते.
- या प्रकारात नराची अदलाबदल अपेक्षित असते. तसे केल्यास उत्तम परिणाम दिसतात. याचा मुख्य हेतू जनुक प्रवाह हा आहे.

Konkan kanyal goat breeds
Intercrop Management : आंतरपीक पद्धतीचे पूरक नियोजन कसे करावे?

न्यूक्लियस प्रजनन प्रणाली ः
- यामध्ये बोकड तसेच जातिवंत शेळ्या कळपात बदलण्यात येतात. ही प्रणाली राबविण्यासाठी नियोजित संरचना असण्याची आवश्यकता असते. या प्रकारात वेगवेगळे तीन थर असतात.
- पहिला थर अत्यंत जातिवंत चांगल्या शेळ्या, बोकडांचा (न्यूक्लियस कळप) असतो. हा थर शक्यतो शासकीय संस्थेत नियंत्रित प्रजनन करून ठेवलेला असतो.
- दुसऱ्या थरात मोठा कळप असलेले शेतकरी असतात. न्यूक्लियस कळपातील नर व मादी दुसऱ्या थरात वेळोवेळी हस्तांतरित करण्यात येतात.
- तिसऱ्या थरात लहान कळप असलेले पशुपालक असतात. या व्यावसायिक थरातील पशुपालकाने दुसऱ्या थरातील पशुपालकाकडून शेळ्या घेणे अपेक्षित असते. अशा प्रकारे न्यूक्लियस कळपात होणारी आनुवंशिक सुधारणा खालील दोन्ही थरांत होण्याची अपेक्षा असते.

न्यूक्लियस प्रजनन प्रणालीचे मुख्य प्रकार ः
१) अन-आच्छादित न्यूक्लियस प्रणाली(Open Nucleus Breeding System) ः
- या प्रकारात जनुक प्रवाह तिन्ही थरांतून होतो. पहिल्या थरातील नर, मादी दुसऱ्या किंवा तिसऱ्या थरात जाऊ शकतात. दुसऱ्या व तिसऱ्या थरातील अत्यंत उत्कृष्ट शेळी, बोकड पहिल्या थरात पाठवतात.
- उत्तम गुणवत्ता असलेली शेळी, बोकड, मग ते न्यूक्लियस कळपातील असोत किंवा व्यावसायिक कळपातील, त्यांना आनुवंशिक सुधारणेत योगदान देण्याची संधी मिळते.
२) आच्छादित न्यूक्लियस प्रणाली (Closed Nucleus Breeding System) ः
- या प्रकारात जनुक प्रवाह न्यूक्लियस कळपातून व्यावसायिक कळपाकडे जातो.
- या प्रणालीमध्ये रोगाचा प्रसार होण्याचा धोका टळतो. न्यूक्लियस कळपाचे वर्चस्व राहते.
- उत्तम गुणवत्ता असलेल्या नर, मादीला आनुवंशिक सुधारणेमध्ये योगदान देण्याची संधी मिळत नाही.

कृत्रिम रेतनाचा अवलंब ः
कळपातील बहुतांश शेळ्या एकाच वेळी माजावर आल्यास सुधारित रेतन पद्धतीचा अवलंब करण्यास फायदेशीर होऊ शकते. काही संप्रेरकाचा वापर करून शेळ्या एकाच वेळी माजावर आणतात.
१) केंद्रीय शेळी संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी संप्रेरक वापरून स्पंजेस तयार केले आहेत.
हे स्पंजेस शेळ्यांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ साधारणपणे १४ दिवस ठेवले जातात. हे स्पंजेस काढल्यानंतर ४८ ते ७२ तासांमध्ये बहुतांशी शेळ्या माज दाखवतात. त्यानंतर शेळ्या कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक रेतन पद्धतीने भरविल्या जातात.
२) या पद्धतीचा अवलंब तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार करणे आवश्यक आहे.

कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर ः  
१) सध्या मांसाची मागणी जास्त असल्यामुळे कमी वयामध्ये बोकड मांसाकरिता विकले जातात. त्यामुळे पैदाशीकरिता चांगली आनुवंशिक गुणधर्म असलेले बोकड उपलब्ध होत नाहीत.
२) बोकड वाढवून पैदाशीकरिता विक्री करणे ही संकल्पना राज्यामध्ये रुजलेली नाही. त्यामुळे चांगल्या बोकडाचे वीर्य संकलित करून कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब केल्यास चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेली पिढी तयार होते. 
३) कृत्रिम रेतन केल्यामुळे जातिवंत बोकडाच्या वीर्याचा वापर होऊन उच्च दर्जाच्या शेळ्या तयार होऊ शकतात. प्रजननापासून प्रसारित होणाऱ्या आजारांचे संक्रमण थांबविण्यास मदत होते. 
४) गोठविलेल्या रेतमात्रा वापरून किंवा बोकडाचे ताजे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करता येते. या पद्धतीचा अवलंब करण्याकरिता प्रशिक्षण घेणे किंवा तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतन करणे फायदेशीर ठरते.

गर्भधारणा निदान ः
१) शेळीचा गाभण काळ हा पाच महिन्यांचा असतो.
२) गाभण काळामध्ये शेळयांची विशिष्ट काळजी घेणे आवश्यक असते.
३) गर्भधारणा निदान झाल्यास गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होऊ शकते.
४) शेळ्यामध्ये सलग दोन ऋतुकाळामधील अंतर सरासरी १८ ते २२ दिवस एवढे असते.
५) एकदा शेळी माजावर आल्यानंतर गर्भधारणा न झाल्यास शेळी पुढील १८ ते २२ दिवसांनी परत माज दाखवते. असे न झाल्यास शेळ्यांमध्ये गर्भधारणा झालेली असावी, असा प्राथमिक अंदाज घेऊ शकतो.
६) गाभण काळातील शेवटच्या ४५ दिवसांमध्ये शेळीच्या पोटाचा आकार किंवा गर्भाच्या हालचालीवरून गर्भधारणेचा अंदाज घेण्यात येतो.
७) अल्ट्रासोनोग्राफी किंवा प्रयोगशाळेमध्ये काही चाचण्याकरून गर्भधारणा निदान होते.
यामुळे गाभण काळाच्या निश्चित वेळेनुसार शेळ्यांचे खाद्य आणि इतर व्यवस्थापन झाल्यास याचा फायदा शेळीपालकांना निश्चितच होऊ शकतो.
---------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. प्राजक्ता जाधव, ९८१९६६४७५१
(सहायक प्राध्यापक, पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com