
डॉ.सचिन रहाणे,डॉ दिनेश भोसले
कालवडीच्या पोटातील जंत व अंगावर असलेले विविध परोपजीवी कालवडीच्या वाढीत अडथळा ठरतात. त्यांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे. कालवडींना जंत संसर्ग हा जन्मापूर्वी गर्भाशयातून सुद्धा होतो. त्यानंतर चारा, पाणी, परिसर व इतर कीटकांपासून जंत प्रादुर्भाव होऊ शकतो. जंतांचे प्रामुख्याने चपटे जंत, गोल जंत व पर्णाकृती जंत अशा तीन प्रकारात वर्गीकरण होते. त्याचप्रमाणे शरीरावर गोचीड, उवा, पिसवा, गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होत असतो.
जंत व बाह्य परोपजीवींचे आरोग्यावर होणारे परिणाम ः
१. कालवड अशक्त होते, कालवडीची वाढ खुंटते.
२. कालवडीचे पचन बिघडते, त्यामुळे कालवडीला हगवण लागते.
३. कालवडीच्या शरीरात विविध घटकांची कमी झाल्यामुळे पोटात पाणी होऊन पोटाचा आकार खालच्या बाजूला वाढलेला दिसतो, तसेच कधीकधी जबड्याच्या खालच्या बाजूला सूज आलेली दिसते.
४. कालवडीची त्वचा खरबरीत होते, केस लांब होतात व उभे राहतात.
५. कालवडीची हाडे दिसू लागतात, डोळे खोल जातात.
६. मोठ्या प्रमाणावर रक्तक्षय झाल्यास कालवड दगावते.
७. कालवडीची वाढ सुरवातीलाच खुंटल्यास त्या वेळेवर माजावर येत नाहीत. गाभण राहण्यात सुद्धा अडथळे येतात.
जंत निर्मुलन ः
१) कालवडीला गर्भाशयात गोल कृमींचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे कालवड जन्माला आल्यावर दहाव्या दिवशी पहिली जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते.
२) त्यानंतर प्रामुख्याने चपटे कृमी कालवडींना मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करतात. पावसाळ्यात किंवा ज्या भागात दलदल आहे, नदीकाठी किंवा तळ्याच्या कडेला चारा आहे किंवा चरायला सोडले जाते तेथे पर्णाकृती जंतांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा वेळेस पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पर्णाकृती जंतनाशक पाजावे.
जंत निर्मुलन वेळापत्रक ः
डोस ----वय --- जंतनाशक
१ --- १० दिवस --- पिपराझीन किंवा अल्बेंडाझोल
२--- पहिला महिना --- अल्बेंडाझोल अधिक आयव्हरमेक्टीन
३--- दुसरा महिना --- फेंबेंड्याझोल
४--- तिसरा महिना ---- क्लोझान्टेल
५--- चौथा महिना --- फेंबेंड्याझोल अधिक आयव्हरमेक्टीन
६---- पाचवा महिना --- अल्बेंडाझोल
७--- सहावा महिना ---- डोरामेक्टीन किंवा आयव्हरमेक्टीन (इंजेक्शन)
८---- नववा महिना ---- ऑक्सिक्लोनाझोइड अधिक लेवामिसोल
९---- १ वर्ष ---- डोरामेक्टीन किंवा आयव्हरमेक्टीन (इंजेक्शन)
(टीप ः गोचिड प्रादुर्भाव झाल्यास वापरावे.)
बाह्य परोपजीवींचे नियंत्रण ः
१) बाह्य परोपजीवीमध्ये प्रामुख्याने गोचीड सर्वात जास्त नुकसान करतात. गोचीड निर्मुलनासाठी विविध मार्ग अवलंबता येतात जसे
की, इंजेक्शन देणे, गोचिडनाशक फवारणी करणे किंवा पाठीच्या कण्यावर औषध सोडणे. गोठ्यातील गोचीड निर्मूलनाचे विविध पद्धती वापरून समूळ गोचीड निर्मुलन करावे.
२) गोमाशा, पिसवा, डास, चिलटे यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्यात विविध उपाययोजना कराव्यात. गोठा स्वच्छ ठेवावा, गोठा हवेशीर असावा, गोठ्याच्या आजूबाजूला पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, गवत झाडेझुडपे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
जैविक पद्धतीने गोचीड, गोमाशा प्रतिबंध उपाय ः
१) एक लिटर पाण्यात ४० मिलि करंज तेल, ४० मिलि नीम तेल आणि ४० ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करावे.
२) तयार केलेले द्रावण वासरांच्या अंगावर ३ ते ४ दिवसाच्या अंतराने लावावे. तसेच गोठ्यातही फवारावे. ३) जैविक द्रावण वापरल्यास इतर रासायनिक किटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेसारखे प्रकार टाळता येतील.
लसीकरणाचे नियोजन
१) वासरांमध्ये लसीकरण खूपच महत्त्वाचे आहे. साथीचे आजार झाल्यावर त्याचा उपचार करणे खर्चाचे असते. तसेच उपचार करूनही वासरे जगण्याची शक्यता खूप कमी असते.
२) लसीकरण केल्याने कालवडींना त्या आजाराविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती मिळते. त्या आजारांपासून तिचे संरक्षण होते. प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत, थायलेरिओसिस तसेच ब्रुसेलोसिस या आजारांविरुद्ध लसीकरण केले जाते. वेळापत्रकानुसार लसीकरण न चुकता करावे.
लसीकरणाचे वेळापत्रक ः
अ.क्र.---लसीचे नाव ---पहिली मात्रा(वय महिन्यात) ---बुस्टर मात्रा---पुढील मात्रा
१---घटसर्प ---६महिन्यानंतर --- --दर वर्षी
२.---फऱ्या ---६महिन्यानंतर----- --- दर वर्षी
३----लाळ खुरकत ----४ महिन्यानंतर ---१ महिन्यानंतर ---दर सहा महिन्यांनी
४ ---ब्रुसेलोसिस ---४ ते ८ ----- -------आयुष्यात एकदाच
५----थायलेरिओसिस----३ महिन्यांनंतर -------- दर ३ वर्षांनी
लसीकरण करताना महत्वाच्याबाबी ः
१) लसीकरण करण्यापूर्वी वासरांचे जंत निर्मुलन करून घ्यावे. बाह्य परोपजीवी जसे गोचीड, गोमाशा, पिसवा यांचे नियंत्रण करावे.
२) लसीकरण करताना वासरांचे आरोग्य चांगले असावे. आजारी वासरांचे व ताण तणाव असलेल्या वासरांचे लसीकरण करू नये.
३) लसीकरणाचे वेळापत्रक तंतोतंत पाळावे. काही लसी ठराविक कालावधीतच द्याव्या लागतात, अन्यथा त्यांचा योग्य परिणाम दिसून येत नाही. ब्रूसेल्लोसीस आजाराची लस ८ महिने वयापेक्षा अधिक वयाच्या कालवडींना करू नये.
४) लसीकरण करून त्याची नोंद करून ठेवावी, जेणेकरून बूस्टर तसेच पुढील मात्रा कधी द्यायची याचे नियोजन करता येईल.
५) लसीकरण केल्यानंतर वासरावर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.
६) लस नामांकित कंपनीचीच खरेदी करावी. लसीची शीतसाखळी अबाधित राहील याची काळजी घ्यावी.
७) लसीकरण सकाळी व संध्याकाळी थंड वातावरण असतानाच करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.