Team Agrowon
मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो; परंतु वर्षातून दोन किंवा तीन पिकांची लागवड करत असल्यास दरवर्षी मातीचा नमुना घेण्याची गरज असते.
मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके आणि जलसिंचन यांचा विचार करून नमुना घ्यावा.
निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.
इंग्रजी ‘व्ही` अक्षराप्रमाणे खड्डा खोदून खड्ड्याच्या एका बाजूची साधारणपणे चार सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी. ही माती स्वच्छ घमेल्यात घ्यावी.
शेतामधील खते साठविण्याची जागा, काडीकचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळील जागा, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत.