Team Agrowon
राज्यातील साखर उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा १६ टक्के घट होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा ऊस कमी उपलब्ध झाल्यामुळे साखर कारखान्यांनी गाळप हंगाम लवकर आटोपता घेतला, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली.
यंदा देशात साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता जवळपास मावळली आहे.
"यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात १०७ ते १०८ लाख टन साखर उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. आधीचा अंदाज १२८ लाख टन उत्पादनाचा होता,`` असे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले. गेल्या हंगामात १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
गेल्या वर्षी राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे साखर कारखाने जूनच्या मध्यापर्यंत सुरू होते. यंदा मात्र कारखान्यांची धुराडी लवकर बंद होत आहेत.
`` कारखाने झपाट्याने बंद होत आहेत. बहुतेक सगळे कारखाने या महिन्याच्या अखेरीस गाळप बंद करतील. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहतील,`` गायकवाड म्हणाले.
यंदाच्या हंगामात राज्यातील २१० पैकी १५५ कारखान्यांनी २६ मार्चला गाळप थांबवले आहे. या काळात सुमारे १०४ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी २६ मार्चपर्यंत ११६ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात साखर उत्पादन घटल्यामुळे आता अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी दिली जाणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साखर उद्योगाने उपलब्ध ऊस क्षेत्र व समाधानकारक पावसाचा हवाला देत जादा साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.