Team Agrowon
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयाअंतर्गत नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले होते. सध्या या कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
या कारखान्यांनी एक कोटी पाच लाख ६५ हजार ७७८ टन उसाचे गाळप तर एक कोटी सहा लाख ७९ हजार ६४१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
मागीलवर्षी २९ साखर कारखान्यांनी एक कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत ४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप कमी झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.
नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात २० खासगी तर ११ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता.
यंदा हंगामाची सुरुवात २२ आक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली.
परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील सहा सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश होता.
मागीलवर्षी नांदेड विभागाचा गाळप हंगाम जूनपर्यंत लांबला होता. यात २७ कारखान्यांनी एक कोटी ४७ लाख आठ हजार ३४७ टन उसाचे गाळप, एक कोटी ५३ लाख २१ हजार ६५३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.
त्या तुलनेत ४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप कमी झाले आहे.