Team Agrowon
गोदाम व्यवसाय सुरू करताना समुदाय आधारित संस्था महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत उभारणी करण्यात आलेल्या गोदाम व्यवस्थेचा फारच कमी उपयोग करून घेत असून हे प्रमाण अत्यंत असमाधानकारक आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून या संस्था मोठा खर्च करून गोदाम उभारणी करतात आणि नाफेड खरेदी साठी गोदामाचा वापर करतात, परंतु हा कालावधी अत्यंत कमी असल्याने संपूर्ण वर्षभर या गोदामांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.
काही संस्था बीजोत्पादन करीत असून नाफेड व बीजोत्पादन या माध्यमातून गोदाम काही प्रमाणात शेतीमालाने भरल्याने त्यातून काही उत्पन्न शेतकरी कंपनीस मिळत आहे.
गोदामे वर्षातील किमान नऊ महिने उपयोगात येत असून इतर संस्था मात्र त्यांचे गोदाम तीन महिने उपयोगात आणून उत्पन्न प्राप्त करीत आहे, परंतु हे पुरेसे नाही. त्याचप्रमाणे गोदाम भाड्याने देण्यापेक्षा त्यात व्यवसाय करणे केव्हाही नफ्यात नेणारे असेल.
नाफेडच्या खरेदीचा व्यवसाय उभारणीसाठी उपाय केला तर तो उपाय पूर्ण भरवशाचा नाही, हे प्रत्येक संस्थेला लक्षात आले आहे, परंतु मागील तीन ते पाच वर्षात प्रत्येक वर्षी दोन्ही हंगाम मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपये उशिरा का होईना मिळाल्याने हा व्यवसाय बऱ्याच शेतकरी कंपन्यांना सोडावासा वाटत नाही.
काही कंपन्या समाधानी आहेत, तर काही असमाधानी आहेत. याला विविध कारणे आहेत, परंतु नाफेड खरेदीमुळे राज्यात बऱ्याच शेतकरी कंपन्यांची निर्मिती झाली, हे कंपनी निर्मितीचे दुसरे कारण आहे.
पूर्वी शेतकरी कंपनी तयार होण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (२०१०-२०१९) हाच प्रकल्प प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे. नाफेडचे कामकाज करण्यात सुरवातीला दोन फेडरेशन होते.