Team Agrowon
भारतात सध्या डेअरी उत्पादनांची टंचाई जाणवत आहे. लाॅकडाऊनमध्ये दुभत्या जनावरांचे प्रजनन कमी झाले तसेच लंपी रोगामुळे गोवंशाची झालेली जिवितहानी आणि बाधित जनावरांची कमी झालेली दूध क्षमता यामुळं देशातील दूध उत्पादन कमी आहे.
दुसरीकडे मागणीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे दूध आणि डेअरी उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. देशात पुढील वर्षभर टंचाई जाणवू शकते.
जगातील आघाडीच्या दूध उत्पादक भारतावर दूध पावडर आणि इतर डेअरी उत्पादने आयातीची वेळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुधाच्या दरात मागीलवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. बहुतेक भागांमध्ये दुधाचे सरासरी भाव ५६ रुपये प्रतिलिटरच्या दरम्यान पोचले आहेत.
दुधाचे भाव वाढल्याने किरकोळ महागई वाढत असल्याचं सरकारी संस्थांचे म्हणणे आहे. तसं पाहिलं तर ग्राहक किंमत निर्देशांकात दुधाला ६.६ टक्के भारांक आहे. त्यामुळं दूध दरवाढीचा मुद्दा लगेच चर्चेत येतो.
देशात सध्या डेअरी उत्पादनांची मागणी वाढली. मात्र त्यातुलनेत उत्पादन वाढले नाही. परिणामी दरात वाढ झाली. उत्पादन यंदा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतावर दूध पावडर आयातीची वेळ येऊ शकते, असे उद्योगाकडून सांगण्यात येत आहे.