Team Agrowon
गोदन ही भोकर कुळातील दुर्मीळ वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव कोर्डिया घराफ (Cordia gharaf) असून, बोराजिनासिई (Boraginaceae) कुळातील आहे.
गोदन वनस्पतीचा अधिवास दक्षिण आफ्रिकेपासून पूर्व आफ्रिका, पश्चिम आफ्रिका आणि मध्य पूर्व ते भारतीय उपखंड आणि पूर्व इंडोचायनापर्यंत पसरलेला आहे.
इजिप्त, इथिओपिया, भारत, इस्राईल, जॉर्डन, केनिया, मादागास्कर, मोझांबिक, नामीबिया, नायजेरिया, पाकिस्तान, सेनेगल, सोमालिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, सुदान, टांझानिया, येमेन आणि झिम्बाब्वे या देशांत ही झाडे आढळतात.
भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमधील अवर्षणप्रवण भागात गोदन झाडे पाहावयास मिळतात. महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, नगर, बीड, जळगाव, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने नैसर्गिक अधिवासात ही वनस्पती दिसून येते.
मुळे आणि झाडाची साल मलेरिया, आतड्यांसंबंधी विकार आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह याकरिता उपयोगी आहे. त्याचा वापर पशुधनातील विविध विकारांवरील उपचारातही होतो.
तुर्कस्तानमध्ये गोदन फळे ताज्या स्वरूपात खाल्ली जातात. तसेच वाळवून साठवली जातात. फळाचा उपयोग रस किंवा मद्य बनविण्यासाठीही केला जातो. नायजेरियामध्ये फळांचा रसदार लगदा स्थानिक कांगो नावाच्या जाड सिरपमध्ये शिजविला जातो. लापशीसाठी गोड पदार्थ म्हणून वापरला जातो. हा रस दीर्घकाळ टिकवून ठेवला जातो.
सध्या तरी गोदनाची व्यावसायिक शेती केली जात नाही. मात्र रानमेव्याप्रमाणे त्याची विक्री केली जाते. राजस्थानमधील बिकानेर शहरातील बाजारात या फळाची विक्री १८० ते २०० रुपये प्रति किलो दराने होत असल्याची माहिती आहे.