Team Agrowon
बेदाण्याचे अतिरिक्त झालेले उत्पादन आणि बाजारात मागणीपेक्षा बेदाण्याचा पुरवठा अधिक याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला आहे.
बेदाण्याच्या दरात सुधारणा होण्याची चिन्हे सध्यातरी नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीतही यंदा साडेतीन महिन्यांत बेदाण्याची विक्री अंदाजे ६० हजार टन झाली आहे. परिणामी, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेदाण्याच्या दरात घसरण झाली.
हंगाम सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्याला सुमारे २० रुपयांनी दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गोड बेदाणा कडू होत असून, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
राज्यात यंदा बेदाण्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. या वर्षी अंदाजे २ लाख ८० टन इतका बेदाणा तयार झाल्याचा अंदाज व्यापारी आणि बाजार समितीने लावला आहे. वास्तविक, वर्षभर बेदाणा विक्रीचे नियोजन टप्प्याटप्प्याने शेतकरी करत असतो.
नव्या हंगामातील बेदाणा विक्री फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात बेदाण्याची आवक कमी असल्याने बेदाण्याला प्रति किलोस २०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाण्याच्या आवकीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्यास झाला. याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला.
प्रत्येक आठवड्याला प्रति किलोस पाच ते दहा रुपयांनी दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दर कमी होऊ लागल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली.