Team Agrowon
पानमळ्यांची उतरण झाल्यानंतर उन्हाळी पावसाने दडी मारली. याचा परिणाम पानांच्या फुटव्यावर झाला असून खाऊच्या पानांच्या उत्पादनात घट झाली आहे.
बाजारात पानांची आवक कमी असून मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत नागवेलींची उतरण केली. त्यानंतर उन्हाळी पाऊस झाला नाही. त्यातच मॉन्सून पाऊस वेळेत सुरू झाला नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पानांच्या दरात यंदा २५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. दरम्यान, अधिकमास, गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने पानांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
यंदा वेलींची उतरण केल्यापासून पाऊस नाही. त्यामुळे वेलींना फुटवा कमी आहे. त्यातच उत्पादन घटले असून बाजारात मागणी अधिक आहे. त्यामुळे चांगले दर मिळत आहेत.
हवामानाचा परिणाम फुटव्यावर झाला आहे. त्यामुळे वेलींना पानांची संख्या कमी आहे. त्यामुळे उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे.
पानांच्या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्यता पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.