Team Agrowon
राज्यभरात भाजीपाल्याला दर नसल्याने नव्या लागवडी रखडल्या आहेत. गेल्या वर्षातील या कालावधीच्या तुलनेत ५० टक्के ही मागणी नसल्याने रोपवाटिका चालक हतबल झाले आहेत.
रोपांची मागणीच थांबल्याने रोपवाटिकांचे अर्थकारणही धोक्यात आले आहे. तयार झालेल्या रोपांना मागणी नसल्याने दररोज हजारो रुपयांची रोपे खराब होत असल्याची स्थिती आहे.
साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये राज्यात सर्वाधिक भाजीपाल्याची लागवड केली जाते. या हंगामात बहुतांश भाजीपाल्याच्या रोपांना जोरदार मागणी असते. पण यंदा मागणीत घट दिसून येत आहे.
ऑक्टोबरमध्ये राज्याच्या सर्वच भागांत तुफान पाऊस झाला. याचा मोठा फटका भाजीपाल्याला बसला. राज्यातील बहुतांश भाजीपाला पट्ट्यात कोट्यवधी रुपयांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले.
भाजीपाल्याचे दरही खाली आले. भाजीपाल्याची नवी लागवड रखडली. विशेष करून भाजीपाला पट्ट्यात तर लागवड अत्यंत मंद गतीने होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
खर्चा इतके उत्पन्नही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादकांनी सध्या, तरी भाजीपाला लागवडी नियोजन लांबणीवर टाकले आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेकडो रोपवाटिकांमधून राज्यभरात भाजीपाला लागवडीसाठी रोपे जातात. पण गेल्या एक महिन्यापासून या रोपवाटिकांमधून वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे.