Team Agrowon
बैल हा शेतीचा अविभाज्य घटक असल्याचे मानले जाते; परंतु सध्या हीच बैल जोडी महागली आहे. वयानुसार बैलजोडीची किंमत ठरत असल्याने जोडी मागे हजारो रुपयांची वाढ झाली आहे.
४० ते ५० हजार रुपयांच्या पुढे सर्वसाधारण बैलजोडीला दाम द्यावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बैल बाजारात दावणीला बांधलेल्या बैलांना जास्त मागणी असते. तर हातदोर विक्री आणलेल्या बैलांची किंमत कमी असते.
पूर्वी ज्या कुटुंबात अधिक गाई-बैल आणि इतर जनावरे असत. त्यांना अधिक श्रीमंत मानले जात होते;त्या वेळी गुरांना चरण्यासाठी वाव होता. मजूरही उपलब्ध असायचे. आता मजूर टंचाई आहे. त्यांची दिवस मजुरी परवडणारीही नाही. त्यामुळे बैलजोडी गरजेपुरते घेऊन विक्री करणे हा पर्याय पसंतीचा ठरत आहे.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी असायची. मात्र, कालांतराने चारा, पशुखाद्य महागल्याने बैलजोडी ठेवणे शेतकऱ्याला परवडेनासे झाले आहे.
रब्बी हंगामात काही प्रगतशील शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक यंत्राद्वारे पेरणी करून घेतात. मात्र, अनेक ठिकाणी पावसाळ्यात ट्रॅक्टर शेतात जाऊ शकत नाही. परिणामी, बैलजोडीशिवाय पर्याय नसतो.
तात्पुरत्या स्वरूपात खरिप हंगामापुरते बैलजोडी खरेदी करून बहुतांश शेतकरी हा हंगाम पार पाडत असतात. त्यामुळे बैलजोडीचा भाव वाढला आहे.
खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर तालुक्यातील बहुतांश शेतकरी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बैलजोडी खरेदी करून हंगाम संपल्यावर दिवाळीला परत विकून मोकळे होतात.