Team Agrowon
गावरान आंब्याची चव चाखण्यासाठी दर वर्षी प्रतीक्षा करणाऱ्या खवय्यांना यंदा गावरान आंबा मिळणे दुरापास्त होऊ शकते. गावरान आंब्याच्या लोणच्यासाठी गृहिणींना मात्र हात आखडता घ्यावा लागणार आहे. मार्च, एप्रिल महिन्यांतील वातावरणाचा मोठा फटाका पिकांप्रमाणेच गावरान आंबा उत्पादनास बसल्याचे चित्र आहे.
सध्या बाजारात आंब्याची मागणी वाढली असली, तरी गावरान आंबा फारसा दिसत नाही. दर वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंब्याची बाजारात आवक सुरू होते. सध्या संकरित वाणाची रेलचेल आहे. गावरान जातीचा आंबा विशिष्ट, वेगवेगळ्या चवी, आंबटगोड हा आजही ग्राहकांना आकर्षित करतो.
यंदा आरंभी सर्वच ठिकाणच्या आंब्याचे वृक्ष मोहराने बहरले होते. यंदा मुबलक प्रमाणात गावरान आंबे चाखायला मिळतील अशी अपेक्षा असताना वातावरणाच्या बदलाचा फटका आम्रवृक्षांना बसला आहे.
नैसर्गिक संकटामुळे आंब्याचे झालेले नुकसान पाहता यंदा ग्राहकांना बाहेरून येणाऱ्या आंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
सध्या बाजारात बाहेरराज्यातील आलेल्या आंब्याचीच गर्दी आहे. त्यात बदाम, दशहरी, केशरी, लालबाग व कर्नाटकाच्या हापूस आंब्याच्या विक्री केली जात आहे. तथापि, मार्च महिन्यात धुके पडल्याने फुलोरा जळाला.
पूर्वी दिघावे, नाडसे, उंभरे, उंभर्टी आदी भागात नदीकिनारी आम्रवृक्षाच्या आमराया होत्या. त्यात गावातील भाऊबंदकीचा वाटा राहत असे. गेल्या वीस वर्षांपासून अनेक कारणांमुळे आमराई दिसेनाशी झाली आहे.
शासनाच्या शेताच्या बांधावर वृक्षलागवड मोहिमेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी बांधावर आंब्यासारख्या वृक्षाची लागवड केली आहे. शिवाय बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही गावरान आंब्याची झाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. केवळ नैसर्गिक संकटामुळे गावरान आंब्यावर संक्रांत आल्याचे चित्र आहे.