Team Agrowon
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे कांद्यासह कांदा बियाण्यांच्या प्लॉटचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्यांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.
संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन पुढील वर्षाच्या हंगामासाठी शासनाने कृषी विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कांदा बियाणे द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी केली.
कृषी विद्यापीठांमार्फत उत्पादित कांदा बियाण्याचे दर जास्त असतात. याचा गैरफायदा घेऊन खासगी कंपन्यांचे बियाणे चढ्या बाजारभावाने विकले जात आहेत.
कृषी विद्यापीठांना बीजोत्पादनासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा आणि अनुदान मिळत असते.
शेतकऱ्यांना योग्य व रास्त दरांत बियाणे द्यावेत. राहुरी कृषी विद्यापीठाने २०२१ मध्ये १५०० रुपये प्रति किलो, तर २०२२ मध्ये २००० रुपये किलोने विक्री केली होती.
सध्या बाजारात कांदा बियाण्याचे दर कडाडले. त्याचा फायदा खासगी कंपन्यांनी घेतला.
गेली काही वर्षे प्रचंड प्रमाणात तोटा सहन करून शेतकरी मातीमोल भावाने कांद्याची विक्री करीत आहे.
उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.