Team Agrowon
विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया करण अत्यंत महत्त्वाच आहे. विविध पिकांमध्ये बियाणे आणि जमिनीच्या माध्यमातून कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये बीजप्रक्रियेचा देखील समावेश होतो. त्यासाठी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार प्रत्येक पिकाच्या बियाणास बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
सोयाबीन बियाण्यावर बीज प्रक्रिया करताना ३७.५ टक्के कार्बोक्झीन अधिक संयुक्त बुरशीनाशक थायरम ३ ग्रॅम. त्यानंतर ३० टक्के एफएस थायामेथोक्झााम १० मिलि. रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत म्हणजेच पीएसबी २५ ग्रॅम. प्रति किलो सोयाबीनच्या बियाण्याला पेरणीपुर्वी चोळून त्यानंतर पेरणी करावी.
तूर, मूग, उडीद पिकाच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करताना थायरम ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम दीड ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्याला चोळून पेरणी करावी.
ज्वारी च्या बियाण्यावर बीजप्रक्रिया करताना दहा लिटर पाण्यामध्ये ३ किलो मीठ मिसळून द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळून नष्ट करावेत. पाण्याच्या तळाला राहिलेले बी ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर सावलीत वाळवावे. या बियाण्याला नंतर ३०० मेश गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम, २५ एसडी कार्बोसल्फान २ ग्रॅम ज्वारीच्या प्रतिकिलो बियाण्याला चोळून नंतर पेरणी करावी.
मका पिकाची पेरणी करण्यापुर्वी बियाण्याला ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम , पी.एस.बी. जिवाणू २५ ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा १० ग्रॅम. प्रति किलो बियाण्याला चोळून अर्धा तास सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.
बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते आणि जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. याशिवाय पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ करण शक्य होतं.