Team Agrowon
काही ठिकाणी उशिरा लागवड केलेल्या मृगबागेतील निसवण सुरू असेल. घडाच्या गुणवत्ता वाढीसाठी केळफूल व शेवटची फणी कापल्यानंतर, घडांवर ०.५ टक्का पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक १ टक्का युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून स्टिकरसह फवारणी करावी. या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
तीव्र सूर्यप्रकाश, धूलिकण, पानांचे घर्षण यापासून घडांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. घडांचे संरक्षण घड ६ टक्के सच्छिद्रतेच्या पॉलिथिन पिशवीने झाकून घ्यावेत.
केळी पिकास सोटमूळ नसते. केळीला येणारी तंतूमय मुळे जमिनीच्या वरच्या थरात येतात. त्यामुळे वाऱ्यांमुळे केळी झाडांचे मोठे नुकसान होते. झाडांना पॉलिप्रॉपिलीनच्या पट्ट्या किंवा बांबूच्या साह्याने आधार द्यावा.
बागेभोवती वारारोधक कुंपण म्हणून शेवरी लागवड फायदेशीर ठरते. शेवरी लागवड केली नसल्यास, वारारोधक कुंपण म्हणून शेडनेटचा वापर करावा.
जून - जुलै लागवडीच्या बागेला प्रति दिन प्रति झाड १८ ते २० लिटर, ऑक्टोबर लागवडीस ९ ते ११ लिटर तर फेब्रुवारी- मार्च लागवडीतील बागेस ४.५ ते ६.५ लिटर पाणी द्यावे.
जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी या सर्वच लागवडीमध्ये ऊसाचे पाचट, गव्हाचे काड किंवा हरभऱ्याचा भुस्सा यांचे आच्छादन करावे. तसेच झाडांवर केओलीन ८० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
ऑक्टोबर लागवडीच्या बागेमध्ये जमिनीद्वारे युरिया ३६ किलो तर ठिबक सिंचनाद्वारे युरिया ५.५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो प्रति १००० झाडे याप्रमाणात द्यावे.