Team Agrowon
मागील दोन महिन्यांपासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना आज काहीसा दिलासा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनआणि सोयापेंडच्या दरात दोन दिवसांपासून दरात सुधारणा होत आहे.
देशातील बाजारातही दर वाढले. देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांवर आहे.
देशातील सोयाबीन दरात आज क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सोयाबीन भावानं आज सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांचा टप्पा गाठला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.
देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. तरीही सोयाबीनला उठाव असल्यानं दरात वाढ झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४.७० डाॅलरवर होते. रुपयात हा भाव ४ हजार ५०० रुपये होते.
सोयापेंडचे भाव ४६१ डाॅलर प्रतिटनांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर घटलेल्या भावपातळीवरून सुधारत आहेत.
सोयाबीनच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठी घट झाली होती. पण ही स्थिती जास्त दिवस चालणार नाही, असा अंदाज ॲग्रोवनने त्यावेळीच दिला होता.