Team Agrowon
जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी देण्यापेक्षा फवारा पद्धतीने ओलीत केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात.
खारवट पाण्यात बोरॉनचे प्रमाण जास्त आणि सोडियम कार्बोनेटचे प्रमाण ६०० मिली ग्रॅम प्रति लिटरपर्यंत असल्यास २० टन जिप्सम प्रति हेक्टर जमिनीत टाकल्यानंतर खारवट पाण्याचा वापर ओलीतासाठी केल्यास कोणताही अपाय न होता पिकांची चांगली वाढ होते.
जमिनीत जिप्सम बरोबर हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास ते अतिशय उपयुक्त ठरते. खारवट पाण्यातील क्षार मध्यम प्रमाणात असल्यास जमिनीत शेणखताचा वापर केल्याने असे पाणी ओलीतासाठी सर्रास वापरता येते.
खारवट पाणी ओलीतासाठी वापरत असताना जी पिके पाण्यातील खारवटपणा सहन करु शकतात तीच निवडणे योग्य ठरते. यामध्ये कापूस, करडई, बाजरी, ज्वारी आणि गहू या पिकांचा समावेश होतो.
जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जमिनीच्या क्षमतेनूसार सिंचनाचे तंत्र वापरणं आवश्यक आहे. सर्वच प्राकराच्या जमिनी सिंचनासाठी सारख्या प्रमाणात योग्य असतात असं नाही.
जमिनीच्या गुणधर्माचा विचार करुनच तिची सिंचनक्षमता ठरवावी. जसे खोल रेतीमय किंवा गाळाच्या पोयटा आणि संयुक्त वाळू घडण असलेल्या जमिनी कायम ओलीताखाली योग्य असतात.