Team Agrowon
तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा शिफारशीत वापर यासह सिंचन आणि कीड-रोग व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे.
तूर लागवडीसाठी मध्यम ते अति काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि कसदार जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ दरम्यान असावा. साधारण १८ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात तुरीची चांगली वाढ होते.
जर मध्यम जमीन आणि मध्यम पर्जन्यमान असल्यास, लवकर किंवा मध्यम तयार होणाऱ्या वाणांची निवड करावी. यामध्ये ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ किंवा प्रगती, फुले राजेश्वरी, गोदावरी, रेणुका, फुले तृप्ती या वाणांची निवड करावी.
मध्यम ते भारी जमीन असल्यास आणि खात्रीशिर पाऊसमान असल्यास तुरीचे मध्यम कालावधीचे वाण निवडावे. यामध्ये पी.के.व्ही. तारा, विपूला, बी.एस.एम.आर. ७३६, बी.एस.एम.आर. ८५३, बी.डी.एन. ७०८, बी.डी.एन. ७१६, पी.डी.के.व्ही. आश्लेषा या वाणांचा समावेश होतो.
भारी जमीन तसेच खात्रीचे पर्जन्यमान असल्यास उशिरा तयार होणाऱ्या वाणाची निवड करावी. यामध्ये तुरीचे आशा म्हणजेच आय.सी.पी.एल. ८७११९ किंवा पी.डी.के.व्ही. आश्लेषा हे वाण येतात.
तुरीच्या योग्य वाणाची निवड करण अतीशय महत्वाच आहे.
तुर पीक ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पीक सहन करू शकते. सुरवातीच्या दोन महिन्यात चांगला पाऊस व फुलोरा अवस्थेत तुरळक सरींमुळे तुरीच्या उत्पादनात वाढ मिळते.