Team Agrowon
वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, प्रर्जन्यमान या प्रमुख घटकांचा फुलांच्या निर्मितीवर, परागीभवनावर, फळधारणेवर व वाढीवर परिणाम होत असतो. म्हणून भाजीपाला लागवडीसाठी व त्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य कालावधीची निवड करावी.
अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम फुलांची निर्मिती, फळधारणा, फळांचा विकास यांवर होत असतो. म्हणून दर्जेदार उत्पादनासाठी माती परिक्षणानुसार भाजीपाला पिकास समतोल अन्नद्रव्यांचा योग्य वेळी व योग्य मात्रेत मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर होणे अत्यंत महत्वाचे आहे.
वेलवर्गीय भाज्यांच्या पिकांमध्ये नर व मादी फुलांचे भाग एकत्र नसतात, त्यामुळे परपरागीकरणसाठी नर फुलांचे पुंकेसर मादी फुलांपर्यंत पोहचविण्यासाठी मधमाशा, फुलपाखरे व वारा मदत करतात.
काही फळभाज्यांमधे द्वीलिंगी फुले जरी असली तरी त्यातील पुंकेसर व स्रीकेसर एकाचवेळी परपरागीकरणसाठी म्हणजेच फलधारणेसाठी तयार नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत परपरागीकरणसाठी मधमाशांची, फुलपाखरांची आवश्यकता असते.
काही भाजीपाला पिकांमध्ये, प्रामुख्याने वांगी या पिकाच्या एकूण फुलोत्पादनपैकी नैसर्गिक विकृतीमुळे फळधारणा क्षमतेमध्ये अपूर्ण असतात. या पिकांवर फुलांच्या निर्मितीस सुरुवात झाल्यानंतर संजीवकाची फवारणी केल्यास फायदा होतो.
सर्वसाधारणपणे वेलवर्गीय भाज्यांमधे नर व मादी अशी फुलांची वेगवेगळी निर्मिती होत असते. पिकांचे उत्पादन हे मादी फुलांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे मादी फुलांचे प्रमाण वाढल्यास उत्पादनात वाढ होते.
भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ व फळगळ संजीवकाच्या अभावामुळे होत असते. त्यामुळे फुलगळ व फळगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. (नँप्थालीन अॅसेटीक अॅसिड ) या संजीवकचा वापर करावा.