Team Agrowon
बाह्यपरजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरे तणावाखाली राहतात, त्यांचे खाण्यापिण्यात लक्ष लागत नाही, वजन कमी होते. त्यांची वाढ खुंटते, ते खंगत जाते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रोगांना बळी पडतात. हे लक्षात घेऊन वेळेवर पररजीवींचे नियंत्रण करावे.
दुधाळ जनावरांना विविध प्रकारच्या बाह्य आणि आंतरपरजीवींचा प्रादुर्भाव होत असतो. आंतरपरजीवी हे जनावरांच्या शरीरात त्यांच्या पचन संस्थेत किंवा इतर अंतर्गत अवयवांमध्ये वास्तव्य करतात.
विविध प्रकारचे गोचीड, उवा, पिसवा, माश्या तसेच खरजेचे किटाणू इत्यादी बाह्यपरजीवी या प्राण्यांच्या अंगावर किंवा त्वचेमध्ये वास्तव्य करत असतात. हे बाह्यपरजीवी जनावरांचे रक्त शोषण करतात, ज्यामुळे जनावरांची योग्य वाढ होत नाही आणि त्यांचे प्रकृतिमान खालावत जाते.
या परजीवींमुळे दुधाळ जनावरांमध्ये विविध रोग संक्रमित होण्याचा धोका असतो. या परजीवींमुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांची उत्पादन क्षमता खालावत जाते. यामुळे पशुपालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
गोचीड मोठ्या प्रमाणात रक्तशोषण करतात. त्यांची अर्भक अवस्था देखील रक्त पिते. त्यामुळे जनावरांना रक्तक्षय होतो.
चावण्याने बारीक जखमा तयार होतात. त्यामुळे त्वचेचा मायासिस रोग होतो. ज्यामध्ये जखमांमध्ये आळ्या होतात. गोचिडांच्या लाळेमध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे जनावरांना विषबाधा किंवा अर्धांगवायू देखील होऊ शकतो.
गोचिडांमुळे थायलेरिओसिस, बबेसिओसिस, ऍनाप्लास्मोसिस असे घातक संसर्गजन्य रोग होतात, ज्याला गोचीड ताप असे म्हणतात. या गोचीड तापामुळे जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते.