Team Agrowon
कोकणातील बहुतांश आंबा बागा खूप जुन्या असून झाडांची वाढही अवास्तव आणि उंच अशी आहे. परिणामतः अशा झाडांचे व्यवस्थापन करणे आणि तयार झालेली फळ झाडावरून काढणे फार जिकिरीचे ठरते. अशा कलमांपासून उत्पादनही कमी मिळते.
आंब्याची जास्त जुनी झाडे दुर्बळ झाली असतील आणि त्यांचे उत्पादनही कमी असेल अशा झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.
अशा बागांची व्यवस्थापन पद्धतीही प्रमाणित केली आहे. या पद्धतीच्या अवलंबनामुळे विरळ लागवड असलेल्या बागांमध्ये दोन झाडांमध्ये नवीन आंब्याचे झाड लावून या बागा घन लागवड पद्धतीने विकसित करणे शक्य आहे.
आंबा बागांमध्ये अन्नद्रव्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन करणे ही बाब उत्पादन आणि दर्जा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यापीठाने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान प्रमाणित केले असून, त्याची शिफारसदेखील केली आहे.
विद्यापीठाने आम्रशक्ती बहुअन्नद्रव्य फवारा या नावाने फुलोरा आणि फलधारणा या कालावधीत झाडांच्या पानांवर फवारता येणारे रसायन विकसित केले आहे. त्याच्या वापराने फळांची प्रत सुधारून हापूस आंब्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
कोकणातील जांभ्या जमिनीत हापूस आंब्याचे उत्पादन आणि प्रत वाढीसाठी शेणखत ५० किलो, नत्र १.५० किलो युरियाद्वारे, स्फुरद ०.५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पालाश १ किलो सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे प्रती झाडास जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात द्यावे.
पॅक्लोब्युट्रॉझोल ०.७५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रति मीटर झाडाचा व्यास विस्ताराप्रमाणे द्यावे. सल्फेट ऑफ पोटॅश ०.९ टक्का या प्रमाणात तीन फवारण्या फळांचा आकार वाटाणा, गोटी व अंडाकृती असताना कराव्यात.