Anil Jadhao
देशात यंदा कडधान्याची टंचाई वाढण्याची शक्यता आहे. मागील हंगामात तूर, उडीद आणि मुगाचे दर दबावात होते. या तीनही पिकांना हमीभाव मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पेरा कमी केला.
देशातील विविध भागांमध्ये पाऊस उशीरा सुरु झाल्याचाही परिणाम पेरणीवर झाला. त्यामुळं यंदा खरिपातील कडधान्य उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातही उडदाचं उत्पादन कमी राहील.
देशात मागील हंगामात उडदाचे उत्पादन १ लाख ९४ हजार टन झाले होते. पेराही अधिक होता. मात्र यंदा उडदाची पेरणीही कमी झाली. त्यातच पावसाने पिकाला फटका बसला.
यंदा उडीद उत्पादन १ लाख ८४ हजार टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. उडीद उत्पादन कमी राहील्याने एकूण कडधान्याचा पुरवठाही कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
देशातील बाजारात सध्या उडदाची टंचाई भासते. यंदाच्या खरिपात उडदाची पेरणी कमी झाली. परिणामी उत्पादन घटलं. मात्र मागणी कायम आहे. त्यामुळं दरात मोठी वाढ झाली.
भविष्यात उडदाच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सकारनं आयात उडीद खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयात उडदाचेही दर जास्त आहेत. सध्या देशात उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. उडदाचे दर कायम राहतील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.