Turmeric Rate : सणासुदीतही हळद नरमली

Anil Jadhao 

केंद्र सरकारनं मागील हंगामात देशातील हळद उत्पादन वाढल्याचं दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटलंय. २०२१-२२ मध्ये देशात १३ लाख ३१ हजार टन हळद उत्पादन झालं होतं. तर त्याआधीच्या वर्षी ११ लाख २४ हजार टनांवर उत्पादन स्थिरावलं होतं.

मागीलवर्षी हळदीची लागवडही जवळपास तीन लाख हेक्टरवरून साडेतीन लाख हेक्टरवर पोचली होती. मात्र कोरोनानंतर जागतिक पातळीवर हळदीचा वापर घटला होता, त्यात वाढ झालेली दिसली नाही.

नवरात्रीआधी सप्टेंबरपासून सणांसाठी हळदीला मागणी वाढते. परिणामी दरही सुधरतात. मात्र यंदा उलटं चित्र दिसतंय. दर वाढण्याऐवजी नरमले आहेत.

यंदा हळदीला नेहमीप्रमाणं मागणी वाढलेली नाही. निर्यातीसाठीही हळदीला उठाव कमी मिळतोय. त्यामुळं हळदीचा जुना साठा पडून आहे. नवी हळद ३ ते ४ महिन्यांमध्ये बाजारात दाखल होईल. त्यामुळं व्यापारी जुना साठा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी हळदीचा बाजार दबावातच आहे.

वायदे बाजारातही हळदीचे दर मागील १५ दिवसांमध्ये ४०० रुपयाने कमी झाले. एनसीडीईएक्सवर नोव्हेंबरचे हळदीचे वायदे ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने झाले. तर इरोड बाजारात हळकुंडाचे दर ६ हजार ७०० रुपयांवरून ६ हजार ५०० रुपयांवर आले आहेत.  

निर्यातक्षम हळदीचे दरही ७ हजारांवरून ६ हजार ८०० रुपयापर्यंत कमी झाले. पुढील काही दिवसांमध्ये हळदीच्या दरात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे. मात्र मोठी तेजी दिसत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

cta image
येथे क्लिक करा