Turmeric Market : हळदीचे दर टिकून

Anil Jadhao 

देशात दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन, मका पिकांच्या अर्थात साइड मार्केटवर मंदी आली होती. त्याचा परिणाम हळदीच्या दरावर झाला होता. यामुळे हळदीच्या दरात प्रति क्विंटलला ५०० ते १००० रुपयांनी उतरले होते.

या दरम्यान, देशात सुमारे ४० लाख पोती शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे शिल्लक होती. त्यानंतर दिवाळीनंतर मार्केटमध्ये हळदीचे सौद्यास प्रारंभ झाला. त्यामुळे हळद विक्रीसाठी व्यापारी आणि शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे.

सध्या देशातील प्रमुख बाजारपेठेतील इरोड वगळता अन्य बाजारपेठांतील हळदीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इरोड मार्केटमध्ये वर्षभर हळदीची विक्री होत असल्याने दररोज सुमारे ५ ते ७ हजार हळदीच्या पोत्यांची विक्री होत आहे.

मराठवाड्यात दररोज २० ते २५ हजार पोत्यांची विक्री होत आहे. बाजारात हळदीच्या मागणीतही काही प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांत १० लाख पोत्यांची विक्री झाल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. सांगली, निजामाबाद यासह अन्य बाजारपेठांतील हळदीचा हंगाम आटोपला आहे. बाजारपेठेत मंदीचे सावट असले तरी, हळदीचे दर टिकून आहेत.

देशात हळद पिकास पोषक वातावरण आहे. सध्या कंद वाढीचा काळ आहे. त्यामुळे हळदीवर करपा, कंदकुज यांसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही. त्यामुळे यंदा हळदीच्या उत्पादनात वाढ होईल, अशी शक्यता हळद संशोधन केंद्राने व्यक्त केली आहे.

cta image