Anil Jadhao
नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यातील चिनोदासह तळोदा तालुक्यातील बोरद, रांझणी, मोडसह परिसरातकेळीची लागवड करण्यात येते. तसेच शहाद्यातील ब्राह्मणपुरी, जवखेडा, सुलवाडा, सुलतानपूर आदी भागांत केळी पीक बारमाही असते.
केळी पिकाला मोठ्या प्रमाणात खत, महागडी केळीचे खोड, निंदणी, ठिबक सिंचन आदी खर्च येतो. तसेच इतर पिकांना तोड म्हणून अनेक शेतकरी केळीलाच अधिक प्राधान्य देतात.
शहादा, अक्कलकुवा, तळोदासह परिसरांत अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली आहे.
परंतु व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. खर्च निघणेही अवघड होत असल्याचे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर बाजार समित्या जाहीर करतात. परंतु या दरात खरेदी कुणीही व्यापारी करीत नाही. तसेच हमीभावदेखील केळीला नाही.
जाहीर दरांपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी दर दिला जातो. यात लूट होते. केळीला मागणी नाही, दर्जा खराब असल्याचे कारण सांगून व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत केळीला कमी भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळीला योग्य दर किंवा हमीभाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.