sandeep Shirguppe
शनिवार, रविवार, स्वातंत्र्य दिन आणि फरवर्दिन अशा सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. दरम्यान महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
श्रावण सुरू असल्याने पावसाची रिमझिम बरसात, थंडी, हिरवागार निसर्ग अन् ढग खाली आल्याने डोंगरात अडकलेले ढग पाहण्यासाठी आलेले पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.
महाबळेश्वर आणि जवळच असलेल्या रायगडमधील माथेरान येथे आलेल्या पर्यटकांमुळे रिसॉर्टस्, लॉजिंगमध्ये गर्दी पहायला मिळत आहे.
महाबळेश्वर व पाचगणीत वर्षा पर्यटनाचा माहोल असून महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दाट धुक्यात ओसंडून वाहत आहे. तर काही पर्यटक प्रतापगडावरही जात आहेत.
महाबळेश्वरमधील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक पर्यटकांसह दाट धुक्यात हरवले आहे. वेण्णालेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिरलाही मोठी गर्दी होताना दिसत आहे.
हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटले असून डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरली आहे.
धुंद वातावरणात खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदा भजी, मका कणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना पहावयास मिळत आहेत.
मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लँकेट, कानटोपी, मफलर, येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदीसाठी पर्यटकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत.