टीम ॲग्रोवन
‘‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार नैसर्गिक शेतीवर स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
त्यातून नैसर्गिक शेती पद्धतीवर संशोधनास प्रात्सोहन देण्यात येईल,’’ अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.
डॉ. मणी म्हणाले, ‘‘या महिन्याच्या प्रारंभी हैदराबाद येथे देशातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची परिषद झाली. या परिषदेत तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सौन्दाराजन यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. मणी म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२२ च्या अनुषंगाने देशातील कृषी विद्यापीठांसाठीच्या पदवी अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
नैसर्गिक शेतीवर पदवी अभ्यासक्रम असेल. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केव्हीकेंकडे सोपवण्यात येईल.
या परिषदेत विद्यापीठ महसूल निर्मिती मॉडेल, सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशी, नैसर्गिक शेतीसाठी नवीन पदवी अभ्यासक्रम, सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल,
कृषी विद्यापीठांमध्ये नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, आगामी २० वर्षांसाठी कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मिती, देशातील कृषी विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीचे विश्लेषण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नैसर्गिक शेती संशोधनावर अधिक भर देण्यात येईल. बीजोत्पादन तसेच अन्य निविष्ठांच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी तसेच
राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य घेतले जाईल,’’ असे डॉ. मणी म्हणाले.