Team Agrowon
सूर्यफूल हे वर्षभर घेतलं जाणार महत्त्वाचं तेलबिया पीक आहे. हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसते. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात सुर्यफुलाची लागवड करता येते. साधारण ८५ ते ९० दिवसांत सुर्यफुल पीक तयार होतं.
हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत सुर्यफुलाची उत्तम वाढ होते. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकतात. त्यामुळे दुष्काळी भागातही सुर्यफुलाच चांगल उत्पादन मिळतं.
सूर्यफूल हे पीक सूर्यप्रकाश व तापमानास संवेदनशील नसले तरी अधिक उत्पादन मिळण्यासाठी योग्य वेळी पेरणी करणं महत्त्वाच आहे. त्यामुळे सुर्यफुलाची पेरणी जूनचा पहिला पंधरवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते.
कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येतं.
पेरणी करताना दोन ओळींतील अंतर मध्यम ते खोल जमिनीसाठी ४५ सेंमी तर भारी जमिनीसाठी ६० सेंमी इतक ठेवावं. दोन झाडांतील अंतर ३० सेंमी राहील अशा रीतीने पेरणी करावी.
पेरणीसाठी सुधारित वाणाचे हेक्टरी ७ ते ८ किलो आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे वापरावे. सूर्यफुलाचे सुधारित किंवा संकरित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे. सुधारित वाणामध्ये भानू, फुले भास्कर, एल.एस.एफ.-८, टी.ए.एस-८२, डी.आर.एस.एफ.१०८ या वाणाची निवड करावी.
संकरित वाणापैकी एल.एस.एफ.एच.-३५, एस.सी.एच.-३५, डी.आर.एस.एच-१, फुले रविराज, पी. डी.के.व्ही.एस.एच.९५२ या वाणाची निवड करावी.