Team Agrowon
धान्य साठविताना घरगुती स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे फायद्याचे ठरते.
पुदिना पानांची भुकटी किंवा राख धान्यात मिसळल्यास किडींच्या श्वसनामध्ये अडथळा येऊन कीड मरते.
बऱ्याच वेळा साठवलेल्या धान्यामध्ये भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी साठवणुकीवेळी धान्यात मीठ मिसळावे किंवा कांदे ठेवावेत. कांद्याच्या उग्र वासामुळे धान्याला भुंगेरे लागत नाहीत. तसेच मीठ धान्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेते. त्यामुळे जिवाणूंची वाढ होत नाही.
धान्य साठवणुकीवेळी एरंडी, भुईमूग, खोबरेल किंवा मोहरी तेल वापरल्यास किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो. तेलामुळे किडींची अंडी उबण्यास प्रतिबंध होऊन उत्पत्ती थांबते. त्यासाठी १ चमचा तेल प्रति किलो धान्य याप्रमाणे चोळावे. १ क्विंटल धान्यासाठी अर्धा ते एक किलो तेल वापरावे.
या पद्धतीमध्ये कडुलिंबाची वाळवलेली पाने आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यात १० ते १५ लवंगा टाकाव्यात. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून कडुनिंब पाने, लसूण आणि लवंग चांगले बारीक करून घ्यावे. तयार मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवून २ ते ३ दिवस उन्हामध्ये सुकवाव्यात. या गोळ्या कापडामध्ये बांधून धान्यांच्या थरांत ठेवाव्यात. त्यामुळे कीड आणि अळींचा प्रादुर्भाव कमी होतो.
धान्यातील कीड आणि अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाल मिरचीचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी धान्य भरताना प्रत्येक थराला ४ ते ५ लाल सुकलेल्या मिरच्या ठेवाव्यात.
धान्याला लागणारी कीड रोखण्यासाठी लसूण प्रभावी काम करते. त्यासाठी साल न काढलेली लसणाची संपूर्ण गड्डी वापरावी. प्रथम डब्यात धान्य टाकून त्यावर लसणाची एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे साधारण थर ठेवावेत. तसेच डब्याचे झाकणही बंद राहील याची काळजी घ्यावी.
धान्याला लागणारी कीड बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचा वापर करून रोखता येते. यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळवून घ्यावीत. वाळलेली पाने प्लॅस्टिक किंवा कापडाच्या पिशवीत भरावीत. तत्पूर्वी पिशवीला लहान छिद्रे पाडावीत किंवा कापडात बांधावीत. ही पिशवी धान्याच्या गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यामध्ये ठेवावीत. कडुनिंब पानांच्या तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.