Team Agrowon
शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने एक कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. हे टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे न देता फरारी झाल्याने शेतकरी हलावदिल झाले आहेत.
सोमवारी (ता. २७) शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना निवेदन देत पैसे मिळून देण्याची मागणी केली. या व्यापाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे.
पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात जिल्ह्याभरातील विविध भागांतून टोमॅटो विक्रीसाठी येतो. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व शमशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ यादरम्यान शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. मात्र त्याचे पैसे दिले नाहीत.
ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले, ते बाउन्स झाले. या व्यापाऱ्याकडून १७९ शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी ८० लाख रुपये येणे बाकी आहे. व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.
ते सध्या फरार आहेत. व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या गाळे व मालमत्तांचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
नाशिक बाजार समिती प्रशासनास या प्रकरणी माहिती उपलब्ध झाली. व्यापाऱ्याने विकलेला गाळा ताब्यात घेतला. त्याची विक्रीप्रक्रिया सुरू केली आहे.