Team Agrowon
पुणे शहरातील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सव २०२३’ ला शनिवारपासून प्रारंभ झाला.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’अंतर्गत गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येत आहे.
विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले.
या वर्षी महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील, तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश आला आहे.
या वर्षी सुमारे १०५ उत्पादकांनी विभागीय कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतीचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.