Team Agrowon
आजही टिटवीची टिवटिव अशुभ मानली जाते. टिटवीचा कर्णकर्कश आवाज कानावर पडला की कोणतरी जाणार अशी जुन्या मानसांची धारणा आहे. पण या अशुभ संकेत देणाऱ्या टिटवीचं अस्तीत्व धोक्यात आलं आहे.
नदी टिटवी (रिव्हर लॅपविंग) पक्ष्याचे अस्तित्व मोठ्या नद्या, सरोवरे, बेट, वाळू किंवा छोट्या खाडीच्या भागात पाहायला मिळते.
सध्या भारतीय उपखंडात या प्रजातीची संख्या अतिशय वेगाने कमी होत असून, पुढे ही परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याचे मत नदी टिटवी या पक्ष्यावर संशोधन करणारे प्रतीक चौधरी यांनी संशोधनाच्या आधारे मांडले आहे.
या पक्ष्याला ‘कृष्ण टिटवी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. अमरावती जिल्ह्यात फक्त तापी नदीच्या पात्रात आढळणाऱ्या नदी टिटवीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे.
या संबंधीचा शोधनिबंध नुकताच इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. २०२२ ते २०२४ यादरम्यान करण्यात आलेल्या नदी सर्व्हेक्षणात अमरावती जिल्ह्यातील तापी नदीमध्येच या पक्ष्याचे अस्तित्व आढळले आहे.
श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, पूर्णा, बेंबळा, पेढी, पिली, सिपना, गडगा, खापरा अशा एकूण १३ नद्यांचे सखोल सर्वेक्षण केले असता, मेळघाटातील जंगलाला लागून वाहणाऱ्या केवळ तापी नदीतील पात्रामध्येच या नदी टिटवीचे अस्तित्व नोंदवले आहे.
केवळ तापी पात्रातच ३३ पक्षिसंख्या आढळून आली आहे. जिल्ह्यातील इतर तलाव, धरणे, नद्यांमध्ये हा पक्षी आढळून आला नाही.
तापी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात होणारा वाळू उपसा, दगड व माती उत्खनन, नदीपात्रातील हंगामी शेती, जलप्रदूषण, मासेमारीचे नायलॉन जाळे व स्फोटकांचा वापर, भटके कुत्रे, कावळे, स्थानिकांद्वारा पक्ष्यांची अंडी गोळा करणे आदींमुळे नदी परिसंस्थेचा एक घटक असणाऱ्या या पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
Mango Export : लाडक्या हापूस, केसर आंब्याची निर्यात का वाढत नाही?