Team Agrowon
बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे व जातीचे नाव, बियाण्याचा प्रकार, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, बीज परीक्षणाची तारीख, उगवनशक्तीची टक्केवारी, बियाण्याच्या शुद्धतेच प्रमाण अशा गोष्टी तपासाव्यात.
पिशवीवर बियाण्याच एकूण वजन, विक्रीची किंमत आणि विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी तपासून पहाव्यात. यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाणाच्या चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावं. त्यावरील सर्व माहिती वाचून खात्री झाल्यानंतरच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी कराव.
बियाणे खरेदीचे बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये. भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही.
खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅग वरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी.
पेरणी केलेली तारीख नोंदणी करून ठेवावी. पेरणी नंतर चार ते सात दिवसात बियाण्याची उगवण झालेली दिसून येते. पेरणीनंतर खून चिट्ठी वरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास अथवा पिकात फार मोठ्या प्रमाणात भेसळ असल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी.
बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार द्यावी.
कमी दर्जाच्या बियाण्यामुळे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते.