Sugar Market : कारखान्यांनी मोडले साखर विक्रीचे करार

Anil Jadhao 

भारताने मागील हंगामात ११० लाख टन साखर निर्यात केली होती.  मात्र यंदा केंद्राने निर्यात कोटा जाहीर करण्याआधीच कारखान्यांनी ऑगस्ट महिन्यापासूनच साखर विक्रीचे करार सुरु केले होते.

कारखान्यांनी जवळपास २० लाख टन साखर विक्रीचे करार केले. मात्र यंदा केंद्र सरकारने ६० लाख टन निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली.

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ३४ हजार रुपये प्रतिटनाने साखर विक्रीचे करार केले. मात्र आता दर ३७ हजार रुपयांवर पोचले. त्यामुळे काही साखर कारखान्यांनी करारात पुन्हा वाटाघाटी करण्यास सुरुवात केली किंवा करार रदद् केल्याचे वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले.

व्यापारी संस्थांनी कारखान्यांशी करार केल्यानंतर पुढे खरेदीदारांना साखर विक्री केली. आता कारखान्यांनी करार मोडले, मात्र व्यापारी संस्था आपली विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी करार मोडू शकत नाहीत.

महाराष्ट्रातील कारखान्यांनी करार मोडल्यानंतर व्यापारी संस्थांना आता उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करावी लागत आहे, असं एका डिलरनं सांगितलं. भारतीय कारखान्यांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात डिलेव्हरीचे ४० लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत.

निर्यातदारांनी ४९० डाॅलर प्रतिटनाने व्यवहार केले. तर लंडनमधील साखरेचे वायदे ५६८ डाॅलर प्रतिटनांवर होते. त्यामुळं भारतीय साखर आजही आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त पडत आहे.

cta image