sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील पेठ गाव (ता. वाळवा) वसलं आहे. हा भाग ऊस पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु कैलास माळी यांनी उसाला फाटा देत रेशीम शेतीचा पर्याय निवडला.
कैलास यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती. ऊस हे प्रमुख पीक. जोडीला दहा वर्षे भाजीपाला पिकांचा अनुभव घेतला. मात्र ऊस व भाजीपाला पिकांना पूरक व्यवसायाची जोड देणे कैलास यांना गरजेचे वाटले.
सन २०१६ मध्ये सांगलीत रेशीम शेतीचा प्रसार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते प्रोत्साहित झाले, त्या वेळी कैलास यांना रेशीम शेतीचा पर्याय सापडला.
कैलास यांच्यासह परिसरातील काहीजण रेशीम शेतीसाठी एकत्र आले. त्यांना रेशीम अधिकारी बाळासाहेब कुलकर्णी, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
उद्योग उभारणीसाठी मनरेगा अंतर्गत सुमारे एक लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी कैलास यांनी अनुभवी शेतकरी आणि अधिकाऱ्यांकडून ज्ञान घेतले.
सुमारे ४५ फूट बाय २५ फूट असे रेशीम अळी संगोपन शेडचे क्षेत्रफळ आहे. त्यात तीन रॅक्स असून प्रत्येकाचे आकारमान २५ बाय चार फूट आहे.
१४ महिन्यांमध्ये पाच बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच १५० अंडीपुंजांची असते. सांगली जिल्हा रेशीम कार्यालयाकडून त्यांचा पुरवठा होतो.
प्रति शंभर अंडीपुजांचा दर एक हजार ३०० रुपये आहे. त्यासाठी अनुदानाची सोयही आहे. पंचवीस गुंठ्यात व्ही वन तुती वाणाची लागवड आहे.
प्रति १५० अंडीपुंजांच्या बॅचमधून सरासरी १३० ते १४० किलो कोषांचे उत्पादन मिळते. पैकी ८० ते ९० टक्के उत्पादन ‘ए ग्रेड’चे असते.
कऱ्हाड तालुक्यातील वाठार येथे रेशीमधागा निर्मितीच्या युनिटमध्ये कोषांचा पुरवठा केला जात आहे. त्यास प्रति किलो ५५० ते ६०० रुपये दर मिळत आहे.
चौदा महिन्यात पाच बॅचेसद्वारे उत्पादन घेत त्यांनी रेशीम कोषांना स्थानिक बाजारपेठही मिळवली आहे. याचे त्यांना समाधान आहे.
कैलास पूर्णवेळ शेती करतात. त्यांना शेतीत पत्नी रूपाली यांच्यासह वडील, आई सौ. सुमन, चुलते सदाशिव, चुलती सौ. अंजना, सोमनाथ व त्यांच्या पत्नी सौ. वर्षा यांची मोठी मदत होते.