मनोज कापडे
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सध्या भाताच्या पिवळ्याधमक शेतांमध्ये भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत.
भात कापणी अतिकष्टाची असते. मानपाठ एक करणारं, कधीकधी साप-विंचू-काट्याशी सामना घडवून आणणारं, गाळात थांबून बोटांना जखमा आणणारं ते सारं दुःख त्या मजूर माय माउलींनाच ठाऊक.
दिवसभर गाळात पाय घुसवून सपासप विळा चालवावा लागतो. दिवसभर राबल्यावर ३०० रुपये मजुरी मिळते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बायकादेखील स्वतःचे शेतकाम सांभाळून इतरत्र भात कापणीची मजुरी करतात.
हाच भात इकडे इकडे महानगरात येतो. आपण दोन प्लेट 'चायनीज राईस' ३०० रुपये मोजून खातो आणि तोही काहीजण अर्धवट फेकून देतात.
मी भटकंतीत भाताचे एक शीत वाया जाऊ देत नाही. मातीत पडले तरी ते झटकून फुकून खातो. कारण, त्या भाताच्या शिताला जसा सह्याद्रीच्या मातीचा वास असतो; तसाच या शेतमजूर माय माउलींच्या घामाचाही गंध असतो..!