Anil Jadhao
देशात यंदा जवळपास गेल्यावर्षीऐवढीच सोयाबीन लागवड झाली. यंदा जवळजवळ १२४ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. सप्टेंबर महिन्यात सोयाबीन पिकाला पोषक हवामान होतं. त्यामुळं यंदा सोयाबीन उत्पादनही चांगलं हाती येईल, असा अंदाज उद्योगातून व्यक्त होतोय.
मध्य प्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये नव्या सोयाबीनची आवक सुरु झाली. मात्र नव्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असल्यानं दर ४ हजार ४ हजार ३०० रुपयांचा दर मिळतोय. मात्र जुनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयानं विकलं जातंय.
राज्यातही काही ठिकाणी सोयाबीन काढणीला आलंय. राज्यात आजही मोठ्या प्रमाणात मुजरांकडूनच सोयाबीनची काढणी केली जाते. त्यासाठी सोयाबीन काढणीआधीच मजुरांसोबत सौदे केले जातात. सध्या राज्याच्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यात असे सौदे केले जात आहेत.
मजुरांनी यंदा त्यांचे दर वाढविले आहेत. सोयाबीन काढणीसाठी एकरी २ हजार ८०० रुपये ते ३ हजार ४०० रुपयांपर्यंत दर ठरवले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी हे दर अधिक आहेत, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.
सुरुवातीच्या टप्प्यातील सोयाबीन काढणीसाठी तयार आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. यंदा शेतकऱ्यांना १५ ते २० हजारांदरम्यान एकरी खर्च आलाय. आता उत्पादकता काय येते आणि दर कसे राहतात, यावर सोयाबीन उत्पादकांचे नफातोट्याचे अर्थकारण अवलंबून आहे.
मागील हंगामातील १२ ते १५ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याची चर्चा सध्या बाजारात आहे. मात्र हा शिल्लक साठा मोठा नाही, तर एवढं साठा असणं आवश्यक आहे. त्यामुळं याचा बाजारावर दबाव असणार नाही. शेतकऱ्यांनी बाजाराचा वेळोवेळी आढावा घ्यावा. तसंच किमान ५ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन जाणकारांनी केलय.