Team Agrowon
पेरणीचे काम म्हणजे नवनिर्मितीचा शुभारंभ होय. पेरणी केल्याशिवाय बीज मातीत पडणार नाही.
बीज मातीत पडल्याशिवाय ते मातीत झाकले जाणार नाही. बीज मातीत झाकल्याशिवाय ते रुजणार नाही आणि अंकुरून वर येणार नाही.
बीज अंकुरल्या खेरीज ते मोठे होणार नाही. त्यामुळे कृषी कर्मातील अत्यंत महत्त्वाचे नि भविष्याची फलश्रुती सांगणारे कार्य म्हणजे लावणीचे, पेरणीचे कार्य होय.
शेतीची नांगरणी, वखरणी इत्यादी कामे ही पेरणीची पूर्वतयारीच असते. नांगरल्यामुळे आणि वखरणी केल्यामुळे शेतातील माती मोकळी होते.
तिच्यात हवा आणि ऊन यामुळे मऊपणा येतो. त्यानंतर पाऊस पडून वापसा होताच पेरणीसाठी घाई करावी लागते. पेरणी ही निगुतीने करावी लागते.
एखादी सुगरण जसा निगुतीने स्वयंपाक करते तशीच सुगरणीची उपमा पेरणी करणाऱ्या तिफणीला स्त्रिया त्यांच्या गीतातून देतात.